पालकमंत्री गिरीश बापट यांचा मावळातील दहशतीवरून “यु टर्न’

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बाहेरच्या नेत्यांचा फाफटपसारा आणून दशहत निर्माण केली जात आहे. आम्ही त्यांची दादागिरी फोडून काढू असे सांगत या दहशतीच्या विरोधात आपण पोलीस आयुक्‍त आणि निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. मात्र अवघ्या काही मिनिटांतच यावरून “यु टर्न’ घेत प्रचार संपल्यानंतर इतर मतदारसंघातील नेत्यांनी मतदारसंघात राहू नये, यासाठी आपण निवेदन देणार असल्याचे त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे अवघ्या काही मिनिटांतच बापट यांनी घेतलेल्या “यु टर्न’ची चर्चा रंगली होती.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी गिरीश बापट हे आज पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना बापट म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. पैशांच्या जोरावर वातावरण तापवू पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास होणार आहे. मतदार चोखंदळ असून तो महायुतीच्या उमेदवाराच्याच पाठिशी राहिल. जनता ही काय बाजारातील जनावरे नाहीत.

पालकमंत्री म्हणून आपण या मतदारसंघात लक्ष घातले असून पुणे जिल्ह्यातील चारही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, अशी खात्री त्यांनी व्यक्‍त केली. पवारांनी राजकारणातून संन्यास घेण्यास तयार रहावे, त्यांना 23 मे नंतर भगवी लुंगी आणि भगवा शर्ट भेट म्हणून देऊ, असा टोलाही बापट यांनी लगावला. मावळमध्ये दहशत असल्याचे सांगून राष्ट्रवादीला सुरुवातीला बापट यांनी टार्गेट केले. मात्र पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला दहशतीवरून अधिकाऱ्यांना निवेदन देवून त्यांनी दहशत फोडून काढू म्हणणाऱ्या बापटांनी शेवटी एका प्रश्‍नाला उत्तर देताना दहशतीवरून थेट यु टर्न घेतला.

विकासाचा बापट यांच्याकडून दावा

हिंजवडी आयटी पार्कपासून ग्रेड सेपरेटर रस्ते, मेट्रो आणि बायपास आमच्याच काळात झाल्याचा दावा गिरीश बापट यांनी केला. केवळ आम्हीच विकास करू शकतो, असे सांगणाऱ्या बापट यांनी यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कोणताच विकास केला नसल्याचे सांगितले. आश्‍चर्याची बाब म्हणजे खासगीत जे भाजपा-शिवसेनेचे नेते अजित पवारांनी शहराचा विकास केला असे मान्य करतात त्यांच नेत्यांच्या शेजारी बसून बापट यांनी हा दावा आज केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)