नवी दिल्ली – मे महिन्यात एकत्रित वस्तू आणि सेवा करात म्हणजे जीएसटी संकलनात वाढ होऊन ते 1 लाख कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात 94,016 कोटी एवढा जीएसटी जमा झाला होता. मात्र, एप्रिल महिन्यात 1 लाख 13 हजार 865 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. त्यापेक्षा मे महिन्यात जमा झालेला जीएसटी काही प्रमाणात कमी आहे. मे महिन्यात 72 लाख 45 हजार जीएसटी विवरण दाखल करण्यात आली.
एप्रिल महिन्यात 72 लाख 13 हजार जीएसटी विवरण दाखल करण्यात आली होती. या संकलित जीएसटीमधील राज्यांचा भाग त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. आता जीएसटीचे संकलन आगामी काळात वाढत जाण्याची शक्यता असल्याचे अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. कराचे संकलन वाढल्यास कराचे दर कमी होण्याची शक्यता खुली होईल.