जीएसटीचा सोन्याच्या आयातीवर परिणाम 

आयात कमी झाल्याने कर संकलन झाले कमी; अवैध व्यापार वाढू लागला 
सोन्यावरील जीएसटी कमी करण्याच्या मागणीवर जोर 
नवी दिल्ली: जीएसटी अंमलात आल्यापासून सोन्याच्या अवैध व्यवहारात वाढ झाल्याने प्रामाणिक व्यापारी चिंतेत आहेत. सोन्यावर भारतात 10 टक्‍के आयात व 3 टक्‍के जीएसटी आकारला जातो. जीएसटी लागू होताच 2017 साली सोने आयातीत 50 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. रोजगार निर्माण करणाऱ्या दागिने उद्योगाने सोन्यावरील जीएसटी दरात कपात करण्याचा आग्रह वेळोवेळी केंद्र सरकारला करूनही त्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. 
गेल्या चार वर्षापासून दागिने उद्योग अडचणीत आलेला आहे. या आगोदर या उद्योगावर उत्पादन शुल्क लावले होते. त्याविरोधात राष्ट्रीय पातळीवर या उद्योगाने संप पुकारूनही त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नव्हत्या. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत आयातीतली ही घट 29 टक्के आहे. दुसरीकडे विमानतळांवर तस्करीतून येणारे सोने मोठ्या प्रमाणावर पकडले जाऊ लागल्याने अवैध उलाढाल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जीएसटी आकारल्यानंतर सरकारला अशी अपेक्षा होती की, सोन्याचे व्यवहार अधिक पारदर्शी होतील व ही बाजारपेठ अधिक संघटित बनेल, पण सोन्यावर अधिक कर लावल्यामुळे व्यापाऱ्यांना भीती वाटू लागली की, याचा चोरटा व्यापार करणारे कर वाचविण्यासाठी नवे मार्ग शोधतील व सोन्याच्या तस्करीत वाढ होईल. त्यांची भीती खरी ठरली आहे. 
अवैध उलाढाल वाढण्यामागे मुख्य कारण आहे की, सरकार विविध टप्प्यांवरच्या सोने व्यवहारांचा तपास करण्यास असमर्थ आहे. जीएसटीपूर्वी अशी चौकशी होत असे. सोन्याच्या जुन्या दागिन्यांच्या खरेदीवर सध्या जीएसटी लागू नाही. ही सूट गैरव्यवहार करणाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे. अवैध पद्धतीने खरेदी केलेले सोने जुन्या दागिन्यांचे आहे, असे दाखवून करात सूट मिळविली जात असल्याचे दिसून येते. दोन लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या दागिन्यांच्या बाबतीत हा खेळ अधिक होतो. कारण त्यात पॅन क्रमांक द्यावा लागत नाही. केअर रेटिंग एजन्सीतले अर्थतज्ज्ञ म्हणतात की, भारत अनेक वर्षांपासून जगात सोन्याचा दुसऱ्या क्रमांकाचा आयात करणारा देश आहे. अलीकडे मात्र आयातीत मंदी जाणवते आहे. हे व्यवहार असंघटित मार्गाने होत आहेत. 
तस्करी व बेकायदेशीर मार्गाने येणाऱ्या सोन्यामुळे तेलंगणा व आंध्र प्रदेशचा महसूल घटला आहे. महसुली उत्पन्नात दोन्ही राज्यांना 500 ते 800 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. या घटनाक्रमाबाबत दोन्ही राज्यानी चिंता व्यक्‍त केली आहे. गुप्तचर महसूल संचलनालयाने तस्करीचे साडे दहा कोटी रुपये किमतीचे सोने अलीकडेच जप्त केले आहे. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)