लक्षवेधी : जीसॅट-29, इस्रो आणि “मेक इन इंडिया’ 

मंदार चौधरी 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं अर्थात इस्रोचं कौतुक याच्यासाठी करावं लागतं की आतापर्यंत आपण वजनी उपग्रह पाठवण्यासाठी परदेशात जात होतो. आज या घडीला परदेशांना (शत्रू किंवा मित्र) आपल्याकडे खेचून आणायची ताकद इस्रोने निर्माण केली आहे. भारताचं हे पाऊल निश्‍चितच कौतुकास्पद आहे. 

इस्रोने दोन दिवसांपूर्वीच जीसॅट-29 हा उपग्रह आपल्या भारतीय भूमीतून मोठ्या अभिमानानं प्रक्षेपित केला. याबद्दल खास अभिमान वाटायचं कारण म्हणजे आजपर्यंत भारत इतके जास्त वजनाचे उपग्रह अंतराळाच्या कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी परदेशांवर अवलंबून असायचा आणि त्यातल्या त्यात भारताकडे फक्‍त पीएसएलव्ही प्रक्षेपण वाहन होतं. आपण अजून जीएसएलव्हीकडे इतकं दमदार पाऊल उचललेलं नव्हतं. पण या जीसॅट-29 या उपग्रहाच्या प्रक्षेपणाबद्दल आणखी इस्रोचं एक कौतुक नोंदवावं लागतं की हा उपग्रह 3,423 किलो वजनाचा आहे. इतक्‍या प्रचंड वजनाचा उपग्रह कोणाही परकीय शक्‍तीच्या मदती शिवाय इस्रोनं यशस्वीरित्या प्रक्षेपित केला यातच आपल्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना फळ आलं.

एक फक्‍त उपग्रह अवकाशात सोडला आणि आता तो त्याच्या कक्षेत स्थिर राहून पृथ्वीचे चक्‍कर मारेल फक्‍त इतक्‍याशा भ्रमात एका सजग नागरिकाने तरी राहायला नको? स्वतःच्या प्रक्षेपणाच्या आश्‍चर्यासोबत जीसॅट-29 ने अनेक नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहे. भारताचं जून, 2019 मधील जी महत्त्वाची “चांद्रयान-2′ ची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे, त्यातल्या सज्जतेसाठी याचा पूर्ण वापर होणार आहे. आपल्याला कल्पना आहेच की चांद्रयान-1 या मोहिमेद्वारे भारताने जगाला सिद्ध करून दिलं की चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी होतं. “गगनयान’ ही जी भारताची आणखी पुढची मानवी अंतराळ मोहीम आहे, त्या प्रकल्पात या उपग्रहाचा खूप मोठा उपयोग होणार आहे.

जीसॅट-29 हा उपग्रह एक खास प्रकारचा संदेशवहन उपग्रह आहे. या अगोदर “टून्निस’ हा उपग्रह सोडला गेला आहे. पण त्याच्या कार्यक्षमतेपेक्षा जवळपास 15 पट अधिक शक्‍ती या जीसॅट-29 ची आहे. भारताची करप्रणाली व्यवस्था आणि मनोरंजन क्षेत्र ज्या विविध टीव्ही चॅनेल्सवर आधारलेलं आहे, आता हाच उपग्रह दुप्पट वेगाने सगळी चॅनेल्स प्रक्षेपित करू शकेल.

जीसॅट-29 चा वापर इस्रोने आणखी एका चांगल्या कामासाठी करून घेतला आहे. तो म्हणजे भारताच्या पूर्वोत्तर क्षेत्रात ब्रॉडबॅंड सेवा (इंटरनेट सेवा) इतक्‍या परिपूर्ण ताकदीनिशी आज अस्तित्वात नाही. या उपग्रहाचा वापर करून भारताच्या बाकी क्षेत्रांत ज्या वेगाने इंटरनेट चालतं त्याच वेगाने आता पूर्वोत्तरच्या क्षेत्रात या मायाजालाचा वेग राहणार आहे. या उपग्रहावर एक उच्च झूमिंग क्षमतेचा कॅमेरा लावण्यात आला आहे. ज्याला इस्रोने “जिओ आय’ असं नावं दिलं आहे. याचा उपयोग भारताला संरक्षण क्षेत्रात पुरेपूर करून घेता येणार आहे. याच्या झूमिंगचा दर्जा इतका उत्तम आहे की, वर कक्षेत प्रस्थापित असताना जम्मू-काश्‍मीर भागातल्या एखाद्या रस्त्यावरची मोटरसायकलही या कॅमेऱ्याला दाखवता येऊ शकते.

याचा सर्वात मोठा उपयोग असा असेल की, हिंदी महासागरात देशाच्या शत्रूंची जहाजं विनापरवानगीने शिरतात किंवा शिरण्याच्या प्रयत्नात असतात, आता या जहाजांवर जीसॅट-29 नजर ठेवून असेल. आजपर्यंत सोडलेले साधारण उपग्रह जवळपास 600 ते 700 किमीच्या अंतरावर प्रक्षेपित केलेले असतात. पण जीसॅट-29 हा असा उपग्रह आहे की ज्याच्या कक्षेचं अंतर पृथ्वीपासून 36 हजार किमी आहे. त्यामुळेच इतक्‍या दूर किमीवरून संपूर्ण पृथ्वीची छायाचित्र जी आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यात पृथक्‍करणाचा भर जास्त भारत आणि त्याच्या तिन्ही बाजूच्या समुद्रावर असणार आहे. कॅमेरासोबत लांब पल्ल्याची दुर्बिणही लावण्यात इस्रोला यश आले आहे.

भारताच्या पूर्वोत्तर सीमा भागात किंवा जम्मू-काश्‍मीरच्या घनदाट भागात आजही संदेशवहन तितकंसं प्रभावी नाही आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जीसॅट-29 वर “केए’ आणि “केयू’ हे दोन प्रक्षेपणाचे बॅंड्‌स बसविले आहेत. आतापर्यंत पृथ्वीकडून उपग्रहाकडे एक संदेश पाठवला की, तिकडून परावर्तीत होऊन तोसुद्धा एकच यायचा. अशी जुन्या उपग्रहांची रचना होती. पण जीसॅट-29 मध्ये बसविलेल्या या दोन विविधांगी बॅंड्‌समुळे आता पृथ्वीवरून पाठवलेल्या एका संदेशाचं रूपांतर शेकडो परावर्तित संदेशात करता येणार आहे.

हा उपग्रह ज्या रॉकेट वरून प्रक्षेपित केलं गेलं ते म्हणजे – “जीएसएलव्ही मार्क-3′. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं वजन 741 टन आहे. अंतराच्या खालील कक्षेत 10 टनापर्यंत वजनी उपग्रह आणि वरच्या कक्षेत (36,000 कि.मी.पर्यंत) चार टनापर्यंत प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. या प्रक्षेपण वाहनाचे वैशिष्ट्य असे की याची पहिली चाचणी इस्रोनं 2014 साली केली होती. आताची ही दुसरीच चाचणी. या प्रक्षेपण वाहनाला 15 वर्षांहून अधिक वेळ संशोधन आणि कार्यान्वयित करायला लागला.

“मेक इन इंडिया’च्या दृष्टीने एक अतिशय आदर्श पाऊल याच्या रूपात भारताला मिळालं असं म्हणणं येथे वावगं ठरणार नाही. -डअढ बनवताना नव्वद टक्‍के स्पेअर्स भारतीय उद्योगजगताने पुरवले आहेत. “इस्रो’ने तो विविध कंपन्यांनी इस्रोला उभारून दिलेल्या भागांवर इतकं मोठं रॉकेट इस्रोनं उभं केलं.

इथे हे सिद्ध होतं की इस्त्रो जी वैशिष्ट्ये भारतीय कंपन्यांना देऊ शकतो, त्यांची पूर्तता करण्याची क्षमता आता भारतात आहे. पीएसएलव्हीसारखं यश जर आणखी थोड्या दिवसाने जीएसएलव्हीच्या बाबतीत दिसेल, तेव्हा महासत्तासुद्धा त्यांचे मोठ्या वजनाचे उपग्रह कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी आपल्याकडेच येतील. हे एका अर्थानं भारताच्या सार्वभौमत्वासाठी खूप बरं ठरणार आहे. जीएसएलव्ही भारताच्या अंतराळ भविष्यात एक मैलाचा दगड ठरणार आहे. आधीचा पीएसएलव्ही, त्याच्यावर असलेला बाकी देशांचा विश्‍वास आणखी जीएसएलव्ही-मार्क-खखख मुळे आणखी वृद्धिंगत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)