पुणे – एसटी महामंडळाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेली ‘शिवशाही’च्या बसला दृष्ट लागली आहे. या बसेस मार्गावरच बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम होत असून प्रशासनाचा महसूलही घटत चालला आहे. या प्रकाराची एसटी महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे, त्यानुसार या बसेसची तज्ञांच्या माध्यमातून देखभाल आणि दुरुस्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत 90 बसेसची देखभाल आणि दुरुस्ती पूर्ण झाली आहे, त्यामध्ये असेच सातत्य ठेवण्याच्या सूचना मुख्य कार्यालयाने संबधित विभागाला दिले आहेत.
खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटी महामंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत अश्वमेध आणि हिरकणी या बसेस ताफ्यात आणल्या आहेत, या बसेस आरामदायी आणि वातानुकुलित असल्याने प्रवाशांची या बसेसला चांगली पसंती मिळाली होती. या बसेसला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाने पुन्हा एकदा शिवशाही या आरामदायी आणि वातानुकुलित बसेस ताफ्यात आणल्या आहेत.
या बसेसच्या माध्यमातून महामंडळाची प्रवासी संख्या वाढली आहे, त्यामुळे महामंडळाचा महसूलही वाढला आहे. प्रवाशांचा हा प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाने शिवशाही या बसच्या माध्यमातून ” स्लिपर कोच’ सेवा सुरु केली आहे, विशेष म्हणजे महामंडळाने सर्वसामान्य प्रवाशांना परवडतील असे दर ठेवले असल्याने प्रवाशांसह महामंडळालाही त्याचा आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे महामंडळाच्या ताफ्यात सध्या तब्बल 954 शिवशाही बसेस आहेत. मात्र, तांत्रिक कारणामुळे या बसेस मार्गावरच बंद पडण्याच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता, त्यातूनच महामंडळाच्या प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर महामंडळाने त्याची गंभीर दखल घेतली होती, त्यानुसार या सर्व बसेसची सातत्याने देखभाल आणि दुरुस्ती करण्याच्या सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत 90 बसेसची देखभाल आणि दुरुस्ती पूर्ण झाली असून अन्य बसेसचीही देखभाल आणि दुरुस्ती सुरु करण्यात येणार आहे, त्याशिवाय आगामी काळात त्यामध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.