बेल्हे परिसरात भीषण पाणीटंचाई

बेल्हे – पावसाळ्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाने बळीराजाला थोडासा दिलासा दिला. आता यावर्षीच्या भीषण दुष्काळावर मात होईल असे वाटत होते, पण दुष्काळाच्या झळा कमी होण्याऐवजी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

जुन्नर तालुक्‍यातील अल्प पाऊस पडणारा भाग म्हटले की, बेल्हे अणे पठार भागातील गावाचा भाग म्हणून ओळखला जातो. बेल्हे परिसरात बांगरवाडी, गुळुंच वाडी, रानमळा, अणे, पेमदरा, नळावणे, शिंदेवाडी, आनंदवाडी, व्हरूंडी गावांचा समावेश होतो. जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम आणि माळशेज पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तरी या भागात त्याच्या एक टक्काही पडत नाही. तालुक्‍यात पडणाऱ्या पावसाचे मोजमाप हे पूर्व भागात होत नसल्याने पूर्व भागातील नागरिक कायम भीषण पाणी टंचाईला समोरे जात आहेत.

जुन्नर तालुक्‍यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी व महिलांच्या डोक्‍यावरील हंडा कंबरेवर आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या असल्या तरी पाणी टंचाई अणे पठार भागातील नागरिकांच्या पाचवीला पुजली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मते मागताना एका राजकीय पक्षाच्या नेत्याने पिंपळगाव जोगे आणि चिल्हेवाडी धरणातील पाणी अणे पठार भागात आणून अणे पठारावरचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अमक्‍या व्यक्तीला खासदार बनवा, असे ठोकून सांगितले; मात्र या दोन्ही धरणांचे पाणी मुळात धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यासाठी त्यांना यश येत नाही. मग ते पाणी अणे पठार भागात कसे पोहचणार हा संशोधनाचा विषय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)