ग्रेटा, तू ग्रेटच आहेस!

12व्या शतकाच्या उत्तरार्धात “मॅग्नाकार्टा” या जगप्रसिद्ध ब्रिटिश जाहीरनाम्यामुळे लोकशाहीची स्थापना प्रथमच जगामध्ये लागू झाली. “लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांद्वारे चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही’ ही जगप्रसिद्ध व्याख्या लोकशाहीचा मूळ पाया आहे. कोणताही हिंसाचार, रक्त न सांडता लोकांच्या विकासासाठी सत्तापरिवर्तन करणे, हे लोकशाहीचे मूळ उद्दिष्ट आहे. हाच लोकशाहीचा अभूतपूर्व वारसा सांगणारा ब्रिटन, ग्रेटा थनबर्न या 18 वर्षीय मुलीच्या पर्यावरणविषयक भूमिकेने खडबडून जागा झाला आहे. 23 एप्रिल रोजी ब्रिटिश संसदेत केलेल्या भाषणात ग्रेटाने ब्रिटिश संसदेला ब्रिटनच्या पर्यावरणीय भूमिकेवरून धारेवर धरले. पर्यावरणाचा होणार ऱ्हास उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या लोकशाही देशासाठी ती एक चपराक होती. ब्रिटिश संसदेतील सर्व खासदारांनी तिचे भाषण गांभीर्याने ऐकून घेतले. त्या नंतरच्या काही दिवसातच ब्रिटनच्या संसदेने ‘राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी’ जाहीर केली. ग्रेटाने केलेल्या भाषणाचाच तो एक परिपाक होता. एखाद्या देशाच्या संसदेने एका परदेशी युवतीच्या सांगण्यावरून एका महत्वाच्या प्रश्‍नावर भूमिका जाहीर करणे हे बहुदा पहिल्यांदाच होत असावे.

आजचे हे पर्यावरणीय संकट जगावर का आले असावे? पर्यावरणाला घातक असणारी अमेरिकेची आडमुठी धोरणे, विकासाचा नवीन चेहरा म्हणून येणारी नजीकच्या काळातील महासत्ता -चीन, दहशतवादाने होरपळून निघालेला मध्य आशिया, निसर्गसमृद्ध पण तरीही अविकसित असा शिक्का बसलेला आफ्रिका, औदयोगिक क्रांतीच्या भस्मासुराने होरपळून निघालेला यूरोप हे सर्वजण तर याला जबाबदार नाहीत ना? याचे उत्तर काही अर्थाने होकारार्थी द्यावे लागते. विकासाची मोठमोठी शिखरे पादाक्रांत करत असताना आपण अजून पर्यावरणाची किती हानी करणार आहोत!!! हे सर्व कुठंतरी थांबायला हवे. 2015 साली शाश्‍वत विकासाची धेये आणि धोरणे ठरवताना त्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणाचा विचार केला हि त्यातल्या त्यात एक जमेची बाजू आहे. पण खरेच तसा शाश्‍वत विकास होईल का? विकास म्हणले कि, आपल्यासमोर सोयीसुविधा, प्रगती, अर्थव्यवस्था व तिच्या वाढीचा वेग, चंगळवाद इत्यादी गोष्टी येतात. पण या सगळ्या गोष्टी पर्यावरणाला बरोबर घेऊन करता येतील?

एक गोष्ट मात्र नक्की कि जसा जसा आपण पर्यावरण रक्षणाचा अट्टाहास करू तसा तसा वरील शाश्‍वत विकासातील गोष्टींमध्ये हळूहळू घट होणार आहे.मग त्याला काय विकास म्हणायचे? म्हणजेच येथे विकास आणि पर्यावरण यापैकी कुणाचा तरी एकाचा बळी नक्की द्यावा लागणार आहे. ब्रिटनमधील राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी मधील ठरावात एक महत्वाचा ठराव मांडण्यात आला तो म्हणजे इसवी सन 2050 मध्ये ब्रिटनचे कार्बन उतसर्जन शून्य असेल. किती महत्वाचा ठराव आहे!!! ज्या ब्रिटनने जगाला वसाहतवाद, लोकशाही व औद्योगिक क्रांती दिली, तोच ब्रिटन पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करून पर्यावरणाच्या संवेदनशीलतेचा आदर्श जगासमोर ठेवत आहे. याचे अनुकरन प्रत्येक देशाने करायला हवे.
खरेतर ही झाली देशादेशामधील धोरणे! पण आपण काय करू शकतो? यासाठी प्रत्येकाने ग्रेटाचा आदर्श समोर ठेवायला हवा. ग्रेटाने याची सुरुवात आपल्या घरापासुन केली. कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या कुटुंबाला शाकाहारी बनवले, विमान प्रवास कमी केला. या आणि अशा दैनंदिन जीवनातील काही सवयी, ज्या पर्यावरणाला घातक आहेत, त्या कमी करून आपण पर्यावरण वाचवण्यासाठी हातभार लावू शकतो. सर्व जगाने आपल्या उपभोगी, भोगवादी, चंगळवादी जीवनशैलीमध्ये हळूहळू बदल करून या संकटासमोर उभे ठाकले पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सांगितलेली जीवनशैली यासाठीचा आदर्श ठरते. संपूर्णपणे ग्रामविकासावर आधारित आणि पर्यावरणाच्या सानिध्यातील जीवनशैली आत्मसात करणे आजच्या काळाची गरज आहे.

ज्या वयात खेळायचे, बागडायचे, धमाल, मजामस्ती करायची, त्या वयात या स्वीडनच्या छोट्याशा ग्रेटाने सगळ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वळवले. इतकी पर्यावरणाविषयीची संवेदना या चिमुरडीत कोठून आली असेल! हुन अधिक देशामधील शाळकरी मुले “पृथ्वी वाचवा ” या एकाच मागणीसाठी शाळा बंद करून रस्त्यावर उतरली, हि गोष्ट जगाच्या इतिहासात नोंद घ्यायला लावणारी आहे. ग्रेटाचा हाच विचार पुढील काळात आम्हा सगळ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. मोठ्या माणसांनीसुद्धा लहानांकडून शिकावे हे सांगणारी ग्रेटा म्हणूनच ग्रेट आहे!

– प्रवीण मोरे 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)