हरित कचऱ्याचा जीवसृष्टीला धोका

झाडाच्या फांद्यांची योग्य विल्हेवाट न लावता टेकड्या, गवताळ प्रदेशात “डम्पिंग’

पुणे – तोडलेली झाडे अथवा झाडांच्या फांद्यांची योग्य विल्हेवाट न लावता, हा हरित कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. विशेषत: टेकड्यांवरील मोकळ्या जागेत, गवताळ प्रदेशात हा कचरा टाकला जातो. अशा प्रकारे हरित कचऱ्याची शास्त्रीय प्रकारे विल्हेवाट न लावता, तो टाकून दिल्यामुळे शहरातील जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. विशेषत: टेकड्यांवरील स्थानिक प्रजातींची झाडे आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्था यांच्यावर या कचऱ्यामुळे परिणाम होत आहे.

-Ads-

रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीत असलेली अथवा बांधकामासाठी अडथळा ठरत असलेली झाडे महापालिकेतर्फे तोडली जातात. विशेषत: पावसाळ्यात ही झाडे तोडण्याचे प्रमाण जास्त असते. या तोडलेल्या झाडांची, त्यांच्या फाद्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेतर्फे काही निवडक ठिकाणी श्रेडर्स बसविण्यात आले आहेत. याठिकाणी झाडाचे बारीक बारीक तुकडे करून त्यांचा भूगा केला जातो. प्रत्यक्षात मात्र हा हरित कचरा श्रेडर्सपर्यंत न जाता, मोकळ्या जागेत टाकून दिला जातो. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.

याबाबत पर्यावरण अभ्यासक सचिन पुणेकर म्हणाले, “मी पर्वती भागात राहातो, येथून तळजाई टेकडी जवळ असल्याने नेहमीच मी या टेकडीवर फिरायला जात असतो. मात्र अनेकदा पाचगाव पर्वती या परिसरातील मोकळ्या जागेवर, गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या टाकलेल्या असतात. याठिकाणच्या गवताळ प्रदेशात विविध रानफुले असतात. तसेच टिटवी, राखीतित्तर, चंडोल, चश्‍मेवाला अशी जमिनीवर घरटी करून राहणारे पक्षी देखील असतात. हा हरित कचरा तिथे टाकल्यामुळे या जीवसृष्टीवर परिणाम होतो. याव्यतिरिक्त या फेकलेल्या झाडांमध्ये बहुतांश वेळा सुबाभूळ सारख्या परदेशी प्रजातींचा समावेश असतो. या झाडांना असलेल्या शेंगा, फळे, बिया तिथल्या जमिनीत रूजून ही झाडे वाढण्याचा धोकाही याद्वारे उदभवतो. शहरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे हरित कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट न लावता तो टाकून दिला जातो.’

वृक्षप्राधिकरण, उद्यान विभाग प्रकाराबाबत अनभिज्ञ
शहरातील झाडांचे संगोपन करण्यासोबतच आवश्‍यक त्या झाडांना, फाद्यांना तोडून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण आणि उद्यान विभागाकडे आहे. मात्र तोडलेली झाडे टाकण्याच्या प्रकाराबाबत अनबिज्ञ असल्याचे सांगत, उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे म्हणाले, “झाडांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे काही प्रमुख उद्याने आणि टेकडी परिसरात श्रेडर्स उभारली आहेत. याठिकाणी झाडांचा बारीक भुगा करून तो उद्यानांमध्ये जैविक खताच्या स्वरुपात वापरला जातो. महापालिकेतर्फे तोडण्यात आलेल्या बहुतांश झाडे, फांद्या या श्रेडर्समध्ये आणल्या जातात.’

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)