ग्रेट पुस्तक : ट्रेन टू पाकिस्तान – खुशवंतसिंग

अस्मिताच्या वाचकांना मनापासून नमस्कार.

आज ज्या पुस्तकाचा अभिप्राय घेऊन आले आहे त्याला खरं तर पुस्तक न म्हणता थरार म्हणायला हवा. स्वातंत्र्यकाळात झालेला भीषण थरार. ही कथा आहे भारत-पाकिस्तान फाळणीची. त्यात निष्पाप ओढली गेलेली निरागस बालके, वृद्ध अबला स्त्रिया अन्‌ असंख्य तरुण. या वास्तववादी पुस्तकाचे नाव आहे “ट्रेन टू पाकिस्तान” आणि मूळ लेखक आहेत खुशवंतसिंग. याचा मराठी अनुवाद केला आहे अनिल किणीकर यांनी.

हे पुस्तक ती सत्य कथा सांगते, ज्यावेळी पाकिस्तानमधून खचाखच ट्रेन भरून प्रेतं येत होती. एकही व्यक्ती जिवंत येत नव्हती. जिकडे तिकडे हाहाकार धर्मद्वेष उफाळून आला होता अन्‌ या सगळ्यांची झळ सामान्य माणसाला सहन करावी लागत होती. असेच कोणाच्या अध्यातमध्यात नसलेले एक छोटेसे गाव. अगदी सत्तर-पंच्याहत्तर घरे असेलेले, एक ट्रेन त्यांच्यामधे दुवा असलेली फक्त त्यावरच काय हे प्रफुल्लित होते. इथे जातिभेद न करता सारे सलोख्याचे संबंध सगळे बाळगून होते. गावात तशी गुंडगिरी होतीच, गावातील जग्गा हा गावगुंड कुख्यात होता. त्याचे एका मुस्लीम मुलीसोबत प्रेमसंबंध, अन त्यातून अनेक घटना घडत जातात. गावात एक पाश्‍चात्य विचारसरणीचा कम्युनिस्ट कार्यकर्ता येतो अन्‌ नेमका त्याच वेळी गावात एका प्रतिष्ठित व्यक्तीचा खून होतो. साहजिक त्याचा संशय या तरुणाकडे आणि गावगुंड जग्गा या दोघांकडे जातो. पोलीस त्यांना अटक करतात अन गावात नवीनच दुःखद घटना घडते.

पाकिस्तानवरून आलेली एक ट्रेन शीख लोकांच्या प्रेतांनी भरून येते, या घडलेल्या घटनेमुळे गाव संतप्त होतो, भीतीचे वातावरण तयार होते. मुस्लीम लोकांना पाकिस्तानला स्थलांतर करण्यात येणार म्हणून सगळे मुस्लीम दु:खी होतात. कोणाच्या मैत्रिणी, कोणाचे जीवाभावाचे मित्र, कोणाची शेती, घर, दार सगळे सोडून जाताना केलेला आक्रोश हृदय पिळवटणारा आहे. जग्गू ऊर्फ जुगतसिंगची प्रेयसी त्याच्या बाळाची आई होणार होती, तरीही तिला जबरदस्ती पाकिस्तानात पाठवले जाणार होते, काही गावगुंडांचा विचार पक्का होतो. यातील कोणीही वाचणार नाही अशी प्रतिज्ञा घेत ते त्यांच्याच जीवलगांनी भरलेली ट्रेन ते रक्ताने माखून पाकिस्तानात पाठविण्याच्या विचारात असतात. धर्मद्वेष इतका वाढलेला असतो की समोर त्यांचेच कोणी जीवलग आहेत याचेही भान उरले नव्हते.

पुस्तक वाचताना त्या काळी घडलेला थरार स्वतः अनुभवतो आहोत असे वाटते. लेखकांनी त्या वेळेचे, गावाचे, गावातील लोकांच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धती यांचे अगदी तंतोतंत वर्णन केले आहे. लिखाण गुंतागुंतीचे न वाटता सहज वाटते. काही परस्पर विरोधी घटना अन त्यातून काही निष्ठावंत लोकांची झालेली होरपळ, द्विधा मनस्थिती यांची गुंफण लेखकाने साकारली आहे. धर्मद्वेष समाजासाठी, देशासाठी किती घातक ठरतो याचे ज्वलंत उदाहरण या पुस्तकातून अनुभवायला मिळते. या कादंबरीची भारतीय साहित्यात एक अभिजात कादंबरी म्हणून गणना होते. अनेक युरोपियन आणि भारतीय भाषांमधून ती अनुवादितही झाली आहे. चिनार पब्लिशर्स यांनी ती प्रकशित केली असून मी वाचत असलेली ही दुसरी आवृती आहे. ही धगधगती ज्वाळा नक्की वाचा.

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)