ग्रेट पुस्तक : शितू

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार.

कधी कधी नशिबाचे खेळ असें विचित्रपणे आपल्या भोवती खेळत असतात की, त्यात लहानथोर सगळे होरपळून जातात. पण त्यातही ऐक प्रेमाचा ओलावा दिसला, तर सगळे दुःख झेलण्याची तयारी मानवी मन करत असते. आज अशाच एका अभागी मुलीची कथा, व्यथा वाचण्यात आली. तर पुस्तकाचे नाव आहे “शितू” गो. नी. दांडेकर यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचताना डोळ्यातील आसवं आपली वाट अलगद शोधतात. शितू आईविना वाढलेली सात वर्षाची पोर. आत्याच्या भयंकर त्रासाला सामोरी गेलेली.

पहिला नवरा गेल्यानंतर समाज तिला पांढऱ्या पायाची ठरवतो. त्यानंतर तिचे तीस वर्ष वयाच्या माणसाबरोबर लग्न लावले जाते. लग्न काय असते, हेच न कळणारी सात वर्षांची निरागस शितू पुन्हा एकदा विधवा होते अन त्याचे खापर तिच्या माथी मारून तिचे सासरे तिला मारत मारत तिच्या गावी आणून सोडतात. चिडलेले वडील तिला विहिरीत ढकलून देणार, तोच गावचे खोत अप्पा तिची जिम्मेदारी घेण्याचे वचन देतात. तिला मुलगी मानत घरात आसरा देतात. अप्पा गावातील लाडके व्यक्तिमत्त्व. त्यांचा शब्द कोणीही टाळत नसे. सरळ आणि अडीअडचणीला धावून येणारा स्वभाव यामुळे अप्पा यांना गावात मान होता. या अप्पाना दोन मुलगे, सदू अन विसू सदू घाबरट पण धूर्त. विसू धाडसी, खोडकर, पण सरळ मनाचा म्हणूनच दुःखी शितूला पाहून त्याचे मन द्रवते अन्‌ सुरू होते निखळ मैत्रीची कथा…

लहानपणीपासून प्रेमाला मुकलेली शितू अप्पा अन विसू यांच्या सहवासात रमू लागते, पण विसू चा खोडकरपणा दिवसेंदिवस वाढतच जातो. त्यावर लगाम घालणे फक्त शितूलाच जमत असे. चिडून, रागवून का होईना पण तो शितूचे ऐकत असे. विसूच्या खोड्यामुळे चिंतित असलेले अप्पा त्याला शिक्षणासाठी मामाच्या गावाला पाठवण्याचे ठरवतात, अन्‌ इकडे शितू तो दुरावणार म्हणून दुःखी होते. पण विसू नवीन ठिकाणी जायला मिळणार म्हणून आनंदी. अनेक टप्पे घेत कथा पुढे पुढे सरकत जाते, विसूची भेट होईपर्यंत शितूची झालेली घालमेल लेखकाने अचूक टिपली आहे. त्यामुळे वाचकांना तिच्या गहिऱ्या प्रेमाचा अंदाज येत जातो.काही प्रसंग अप्पांसमोर असे येतात की, शितूच्या निरागस प्रश्‍नाची उत्तरे ते देऊ शकत नाहीत. अन वाचक पुन्हा हळवा होतो. कोकण अन्‌ तिथली माणसे यांची जीवनशैली, भाषाशैली अचूक हेरली आहे.

कथेमध्ये येणाऱ्या काही घटनांमुळे पुढे कथा अधिक गुंतागुंतीची होत जाते, विसू अन शितू यांच्या निखळ प्रेमाची कथा कुठे तरी त्याग, समर्पण अन्‌ नेहमीच आड येणारा समाज यांच्या परीक्षेतून जाते.लहानपणी मराठी पुस्तकाच्या अभ्यासक्रमात याचा छोटासा, पण निखळ प्रेमाचे उदाहरण देणारा भाग धड्याच्या रूपात वाचला होता. गो. नी. दांडेकर यांचे लिखाण नेहमीच हृदयस्पर्शी असते. शितू अन्‌ विसूची ही काळजाला भिडणारी कहाणी डोळ्यातून पाणी आणतेच,अन्‌ लिखाणाला नमनही करते. निःस्वार्थ प्रेम, आपुलकी यांना खरंच कोणत्याही जातिधर्माची गरज नसते, हेच कदाचित लेखकाला सांगायचे आहे.. अतिशय सुंदर पुस्तक आहे. गो. नी. दांडेकर यांचे हे पुस्तकं मौज प्रकाशन गृह यांनी प्रकाशित केले असून मी वाचत असलेली ही पुस्तकाची अकरावी आवृत्ती आहे. त्याग, समर्पण अन्‌ निःस्वार्थ प्रेम यांचा संगम म्हणजे हे पुस्तक, याचा शेवट जाणून घेण्यासाठी हे अतिशय सुंदर पुस्तक नक्की वाचा.. नवीन पुस्तकाचा अभिप्राय घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद.

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)