ग्रेट पुस्तक : रेखा

ती आली, तिने पाहिले, तिने जिंकून घेतले सारे… अन आजही ती जिंकतेच आहे जनमानसांच्या मनाला. आजही टिकून आहे ती स्पर्धेत जग जिंकणे सोप्पे नाही अन्‌ नव्हतेच कधी; मग तिच्यासाठी कसे असेल? कायम यशाच्या शिखरावर पाहात आलेल्या सिनेतारिका “रेखा’ला अनेक अडथळे पार करत, हा बॉलिवूड प्रवास जिद्दीने करावा लागला, यश खेचून आणावे लागले. तर आज अस्मिताच्या वाचकांना सिनेतारिका, सौंदर्य साम्राज्ञी रेखा हिच्या जीवनावर आधारित पुस्तकाची ओळख करून देणार आहे तर दिलीप ठाकूर लिखित “रेखा’ या पुस्तकाबद्दल जाणून घेऊ.

खरं तर रेखा या नावातच एक जादू, नशा आहे, पण जीवनाची नशा, रेखाने ज्या प्रकारे घेतली तशी खचित एखादी असेन, ती जगली अन्‌ जगतचं राहिली. लहान वयात तिने या सिनेजगात पाऊल ठेवले. घरची परिस्थिती बेताची; खायला-प्यायला मिळेल न मिळेल अशा परिस्थितीत तिच्या वडिलांनी तिला या क्षेत्रात आणले, दिसायला साधारण रंग रूप, अभिनय माहीत नसलेली रेखा नशीब आजमावण्यासाठी या मोहमयी दुनियेत प्रवेश करती झाली अन्‌ सुरुवातीला तिला अनेक अपमान सहन करत टिकून राहण्यासाठी धडपड करावी लागली.

भडक राहणीमान अन्‌ बिनधास्त वागणे, यामुळे रेखा हळूहळू चर्चेचा विषय होऊ लागली.. काही दिवसात तिला सिनेमाच्या ऑफर येऊ लागल्या अन्‌ ती बऱ्यापैकी नावारूपाला येऊ लागली. तिला “गांव की गोरी’ म्हणून एक वेगळी ओळख मिळाली अन्‌ त्याच धाटणीचे चित्रपट तिला मिळू लागले. अभिनयक्षमता दिवसेंदिवस प्रगल्भ होऊ लागली अन्‌ रेखा हे नाव अभिनय क्षेत्रात जोमाने कार्यरत होऊ लागले.

आणखी एका गोष्टीमुळे रेखा नेहमीच चर्चेत राहिली ती म्हणजे तिची अनेक प्रेमप्रकरणे समोर येऊ लागली. रेखा अमिताभ बच्चन यांचे प्रेम विशेष चर्चेचा विषय झाला होता. आजही हा विषय लोक आवडीने चघळतात. त्यामुळे रेखामध्ये अनेक बदल झाले. रेखाचा बोल्ड अवतार संपून लांब वेणी अन्‌ साडी या सोज्वळ रूपात देखणी दिसू लागली. अभिनय, अन सोज्वळ रूप या दोन्हींमुळे रेखाला अनेक चित्रपट मिळू लागले.

तरुणाईला तिची स्वप्नं पडू लागली. “सिलसिला’ या चित्रपटाच्या वेळी पत्नी जया अन्‌ प्रेमिका रेखा यांच्यासमवेत सेटवर ते तिघेही खासगी बाबी येऊ देत नसत. जया भादुरीने या बाबतीत संयम दाखवल्याचे मानले जाते. रेखाचे वैवाहिक जीवन नेहमी वादग्रस्त अन गूढ राहिले… “खून भरी मांग’ आणि “उमराव जान’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले. अलीकडच्या काळात तिने “कोई मिल गया,’ “दिल है तुम्हारा’ या सारख्या सिनेमांमध्ये काम करून तिच्या परिपक्व अभिनयाची चुणूक दाखवली. ती आजही त्याच उत्साहाने अभिनय करते. वय ही गोष्ट तिच्या आयुष्यात नाहीच जणू. ती आजही तरुण मुलींना लाजवेल असे सौंदर्य मिरवते.

रेखा म्हणजे तारुण्य, रेखा म्हणजे अभिनय, रेखा म्हणजे नशा, रेखा म्हणजे अहंकार, रेखा म्हणजे गूढ, रेखा म्हणजे जिद्द अन्‌ रेखा म्हणजे बरेच काही… हे पुस्तक “रेखा-प्रेमींसाठी’ खास नजराणा आहे, हे नक्की!

– मनीषा संदीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)