ग्रेट पुस्तक : पार्टनर वपु काळे

तुला मी कशी हाक मारू ?
पार्टनर ह्याच नावाने.
आपल्याला खरं तर नावचं नसतं.
बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.

ज्यांनी हे पुस्तकं वाचले आहे, त्यांच्या नक्कीच लक्षात आले असणार कोणत्या सुप्रसिद्ध लेखकाच्या प्रसिद्ध पुस्तकातील हे वास्तवदर्शी वाक्‍य आहे. फार उत्सुकता ताणून न धरता सांगते, या पुस्तकाचे नाव आहे “पार्टनर”वं.पु. काळे लिखित हे पुस्तकं फक्त मनोरंजन न करता वास्तवाचे दर्शन घडवून देणारे आहे. एका सामान्य व्यक्तीभोवती फिरत राहणारी ही कथा आपलीच आहे असे केव्हा वाटायला लागते कळत नाही. नात्यांची उकल हळूहळू होत जाते अन समोरच्याचे वागणे खरंच असे का? असे प्रश्‍न पडायचे बंद होतात. असो! ही कथा आहे सामान्य जीवन जगणाऱ्या श्री ची.

मेडिकल स्टोअरमधे काम करणारा श्री तडजोड शब्द घेऊनच जन्माला आला असावा बहुदा. मोठा भाऊ अरविंद नेहमीच आजारी. त्या कारणाने नेहमीच घरात लाडका अन सहानुभूतीस पात्र. त्यामुळे आईचा ओढा त्याच्याकडेच आई, भाऊ अन वहिनी यांच्याकडून उपेक्षाचं मिळालेला श्री, भावाचे लग्न झाल्यावर रात्री झोपण्यासाठी बाहेर कुठे तरी सोय करण्यासाठी प्रयत्न करत असतो अन त्याच वेळी त्याला आधार मिळतो एका स्वछंदी मित्राचा की, तो स्वतः आनंद वाटणारा, मिळवणारा अन जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा. नाव,गाव न विचारताच हे दोघे एकमेकांचे पार्टनर बनून जातात. पुढे या श्रीच्या आयुष्यात एक मुलगी येते. एक आशेचा किरण घेऊन आलेली ही सुंदर मुलगी, तिचा लाभलेला सहवास अन त्यासाठी पुन्हा केलेल्या तडजोडी श्रीबद्दल आदर निर्माण करतो. दोघांचे लग्न होते अन पुढील संसार चालू होतो. रूम पार्टनर त्याचे स्वछंदी आयुष्य जगत असतो.

श्रीचा संसार अन पार्टनरची सोबत अन मदत मनाला स्पर्श करून जाणारी आहे. ही कथा मुळी कोणा एकाला शोभणारी नसून अनेकांची व्यथासुद्धा आहे. पार्टनर वाचत असताना वेळेचे भान राहत नाही की, मन इकडे तिकडे भरकटत नाही. वपु काळे यांच्या लिखाणाबद्दल त्याबद्दल मी काय बोलाव? छोट्याश्‍या ज्योतीने सूर्याची बरोबरी केल्यासारखे होईल.

लेखक, कथाकथनकार, आर्किटेक्‍ट, व्हायोलिन व हार्मोनियमवादक,उत्तम रसिक अन उत्तम फोटोग्राफर असणाऱ्या सुंदर मनाच्या वपु यांनासुद्धा साहित्य प्रेमी पार्टनर’चं मानत आले आहेत. पुस्तकांची भाषा दैनंदिन आहे. त्यामुळे आपण त्या घटनेचे साक्षीदार आहोत की काय, असा भास क्षणभर होतो. अनेक नातेसंबंध आपण रोज जोडत असतो. काही नाती दैवी असतात, तर काही दैवी देणगी असतात. आईवडील, भाऊ, वहिनी ही नाती आपल्या हातात नसतात. ती स्वीकारावीच लागतात. “मुलगा होणं आपल्या हातात नसते, पण एखाद्याचा बाप न होणं आपल्या हातात असते.”असे वपु पुस्तकात म्हणतात.

अतिशय छान पुस्तकं आहे खूप दिवसांपासून वाचण्याची इच्छा होती. मैत्रीणीकडून भेट मिळाले हे पुस्तकं अन वाचण्याचा मोह आवरला नाही. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे थोडक्‍यात इतकेच सांगेन, की पुस्तकं संपेपर्यंत खाली ठेवण्याचा मोह होत नाही. पार्टनर तो नाही की जो फक्त जन्मभर तुमच्या जवळ असेल. पार्टनर तोच, जो तुमच्या भावभावना समजून घेईल. मग तो कोणीही असू शकतो. एखादा मित्रसुद्धा.. पुस्तकं नक्की वाचा. मी वाचत असलेली ही पुस्तकाची बत्तिसावी आवृत्ती असून मेहता पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशन आहे. सुंदर मनाला भावणारे हे पुस्तकं नक्की नक्की वाचा. लवकरच नवीन पुस्तकांचा अभिप्राय घेऊन तुम्हाला भेटेन पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत धन्यवाद..

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)