मित्राच्या पडीक जमीनीत फुलवली द्राक्षाची बाग

निमसोडचे शेतकरी चंद्रकांत हुलगे यांनी परिस्थितीवर मात करीत घेतले लाखोंचे उत्पन्न

वडूज – शेती अथवा उद्योगात अपयश आले, कर्जबाजारीपणा वाढला की आत्महत्या करणारे काहीजण असतात. तसे केल्याने संबंधिताचा एकट्याचा जीव सुटतो परंतु पत्नी, मुले व इतर कुटुंबियांना हलाखीचे जीवन जगावे लागते. मात्र परस्थिती कितीही वाईट त्यावर मात करत असतात. अशापैकीच एक आहेत निमसोड (ता. खटाव) येथील चंद्रकांत भगवान हुलगे. उद्योगधंद्यात अपयश आले, तरीही खचून न जाता त्यांनी गोपूज येथील मित्राच्या शेतात एक एकर द्राक्ष बाग फुलविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हुलगे यांचे शिक्षण 10 वी झालेले. 1985 मध्ये परिस्थितीमुळे शाळा अर्धवट सोडून ते मुंबईला गेले. दोन वर्षे कामगार म्हणून काम केले. स्वत:चे काहीतरी भव्यदिव्य करावे या उद्देशाने ते गावी परत आले. त्यांनी स्वत:चा डायमंड कारखाना सुरु केला. परंतु, मंदीची लाट आल्याने व्यवसाय बंद पडला. गावातील द्राक्ष बागायतदार वरुडे बापूंचा सहवास लाभल्याने द्राक्ष शेती सुरू केली. वडिलार्जीत शेतीत एक एकर निर्यातक्षम द्राक्ष लागवड केली. या शेतीतही सात ते आठ वर्षे यश आले नाही. त्यातच सेवानिवृत्त भावाने बागेत वाटणी मागितली.

वाटणी नको म्हणून संपूर्ण बागच भावाला देण्याचा निर्णय घेतला. उद्योग संपला, शेती गेली. अशा परस्थितीत करावयाचे काय असा प्रश्न होता. विचारचक्र सुरू असतानाच गुरसाळे येथील राजेंद्र जाधव हे जुने मित्र भेटले. ते व त्यांच्या पत्नी सुरेखा हे दोघे महाबळेश्वर तालुक्‍यात शिक्षकाची नोकरी करतात. त्यांची गोपूज जवळ माळरानावर पडीक शेती होती. दोघांमध्ये विचार झाल्यानंतर कसलाही करार न करता हुलगे यांनी द्राक्ष बाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा लागवडीसाठी 7 लाख खर्च आला. यामध्ये बॅंकेबरोबर जाधव गुरुजी व अन्य नातेवाईकांनीही सहकार्य केले. निर्यातक्षम युरो च्या भानगडीत न पडता देशी बाजारपेठेत चालणाऱ्या “सुपर सोनाका’ या वानाची त्यांनी निवड केली.

बाग धरल्यानंतर पहिल्या वर्षी 17 टन माल निघाला. 60 रुपये किलोचा दर सापडल्याने सुमारे 10 लाख 80 हजार उत्पन्न निघाले. दुसऱ्या वर्षी 22 टन उत्पादन निघाले. मात्र 45 रुपयांचा दर सापडल्याने 9 लाख 50 हजार उत्पन्न निघाले. यावर्षी सुमारे 25 टन उत्पादन निघेल, अशी शक्‍यता आहे. हुलगे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी मंदाकिनी, मुलगी हर्षा, मुलगा विक्रम, रणजित यांचे सहकार्य असल्यामुळे मजूरीचा खर्च वाचतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)