दूध “तापणार’ : दूध संघ व उत्पादकांचा राज्य शासनाला इशारा
पुणे – राज्यातील दुष्काळी स्थितीत शेतकरी अडचणीत असून दूध संकलन कमी होत असताना गाईच्या दूध खरेदी दरासाठी मिळणारे तीन रुपयांचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी राज्यातील दूध संघ व उत्पादकाच्यावतीने राज्य शासनाकडे केली आहे. हे अनुदान मिळाले नाही, तर आम्हाला दूध खरेदी दरात दोन रुपयांनी कपात करावी लागेल, असेही संघाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य सरकारने 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या गाईच्या दुधाला लिटरला 3 रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यात दूध संघ 22 रुपये दर देते. त्यानुसार एकूण 25 रुपये भावाने दूध खरेदी होत होते. शासनाच्या अनुदानाची मुदत एप्रिल महिनाअखेर होती. त्यानंतर पुढील अनुदानाबाबत कोणताच निर्णय नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात सहकारी दूध संघ आणि खासगी दूध उद्योगाची संयुक्त बैठक झाली आणि त्यातील निर्णयानुसार गाईच्या दूध खरेदी दरात लिटरला 2 रुपये कपात करून दर 25 वरून 23 करण्याचा निर्णय झाला.
यासंदर्भात अधिक माहिती देताना पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णू हिंगे म्हणाले, “सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादनही घटले आहे. दुष्काळामुळे आधीच शेतात काही नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात दुधावरील अनुदान कमी केले, तर पंचाईत होईल.त्यामुळे दुष्काळी परिस्थिती संपेपर्यत तरी अनुदान सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे. या पत्रामुळे काही तरी सकारात्मक निर्णय होण्याची आशा आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी करणार आहोत.’
अनुदान बंद झाल्यानंतर राज्यातील काही दूध संघांनी तातडीने खरेदी दरात 2 रुपये कपात करण्यास सुरूवात केली असली तरी कात्रज दूध संघाने अद्याप 25 रुपये या भावानेच गाईच्या दुधाची खरेदी सुरू ठेवली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही याची काळजी सतत संघाच्यावतीने घेतली जाते आहे, असेही हिंगे यांनी स्पष्ट केले