पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी संस्थेचा कधीही विसर पडू देऊ नये

कुलगुरू रायकर ः डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ

कराड – पदवी घेत असलेल्या अभियंत्यांना, सर्व क्षेत्रातील विस्तृत माहिती व आपण निवडलेल्या क्षेत्राचे सखोल ज्ञान असणे आवश्‍यक आहे. अभियंत्यांनी आपले ध्येय निश्‍चित करून, निश्‍चित केलेले ध्येय दर तीन महिन्यानंतर अद्यावत करावे. कारण, तंत्रज्ञान हे प्रचंड वेगाने बदलत आहे. जीवनामध्ये अपयश हे असते, खरे तर अपयश ही यशाची पायरी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, सततच्या अपयशानंतर अब्राहम लिंकन यांनी देशाच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत मारलेली मजल. आज तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये पदवीप्राप्त करीत आहात त्या संस्थेचा तुम्ही कधीही विसर पडू देऊ नका असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगरू डॉ. व्यंकटेश रायकर यांनी केले.

येथील डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित पहिल्या पदवी वितरण समारंभामध्ये ते बोलत होते. शिवाजी विद्यापिठाचे परिक्षा नियंत्रण संचालक प्रा. महेश काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. अशोकराव गुजर होते. जी. के.गुजर ट्रस्टच्या सचिव डॉ. सौ. माधुरी गुजर, प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला, उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार, प्रा. बी. बी. गुडेवाडी, प्रा. सुनिल बागडे व समन्वयक प्रा. अभिजीत सुर्यवंशी उपस्थित होते.

प्रा. महेश काकडे म्हणाले, सातत्यपूर्ण कार्यक्षमता टिकविण्याचे आव्हान विद्यार्थ्यापुढे आहे. आपल्या उत्कृष्ठ अशा भवितव्यासाठी समाज माध्यमांचा वापर करा. समाजमान्यता, आदर व सत्ता यांची योग्य सांगड घालता येणे आवश्‍यक आहे. डॉ. अशोकराव गुजर म्हणाले, महाविद्यालयीन पातळीवर पदवीदान समारंभ साजरा करण्याचा शिवाजी विद्यापिठाने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. विद्यापिठामध्ये सर्व पदवीधारकांना व्यासपिठावर पदवी मिळू शकत नव्हती. पण आता ते शक्‍य झाले आहे. या समारंभामध्ये, मृणाल दुर्गावळे, प्रगती सुर्वे, स्नेहल सुपेकर, सिध्दार्थ भोकरे, अश्‍लेषा माने-देशमुख, नेहा गाडे, धनश्री चव्हाण यांचा विशेष गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला यांनी केले. परिचय प्रा. सायली शिंदे यांनी करून दिला. आभार प्रा. सौ. स्नेहा पाटील-सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. प्रकाश चोरगे, प्रा. हेमंत शेटे, प्रा. शिवाजीराव लोकरे, प्रा. आशिष पाटील व डॉ. अभिजित झेंडे, प्रा. अयुब कच्छी, अशोक अडसुळे, अबुबकर सुतार, प्रा. प्रकाश बनसोडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. परवीन किणीकर, अल्फीया मुजावर आदिंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)