पुणे – एका सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तूल व चार काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई युनिट तीनच्या पथकाने सदाशिव पेठेतील एलोरा लॉज समोर केली. अजय विजय पांचाळ (रा. जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकातील पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांना अजय पांचाळ हा पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल व चार काडतुसे असा 1 लाख 42 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्याच्यावर दत्तवाडी, भारती विद्यापीठ आणि हवेली पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, घातकशस्त्रजवळ बाळगणे असे चार गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता 15 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय गरुड, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसाग, मच्छिंद्र वाळके, गजानन गणबोटे, अतुल साठे, संदीप राठोड, सुजित पवार यांच्या पथकाने केली.