सेवा हक्क अंमलबजावणीत “जि.प”चा गौरव

सूरज मांढरे यांनी नागरिकांना 200 प्रकारच्या सेवा दिल्या  

पुणे  – राज्यातील जिल्हा परिषदांना लागू करण्यात आलेल्या “सेवा हक्क कायद्या’ची उपयोगिता लक्षात घेऊन, मागील चार महिन्यात पुणे जिल्हा परिषदेने उल्लेखनीय काम केले. 13 सेवा राज्यभर लागू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सुमारे 200 प्रकारच्या सेवा मिळवून दिल्या आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करत राज्य शासनाने जिल्हा परिषदेची पाठ थोपटली. तसेच या कायद्याची अंमलबजावणी करणारे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मांढरे यांचा ग्रामविकास विभागाच्या वतीने गौरव करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सेवा देताना सरकारी कर्मचारी अनेकदा चालढकल करतात. त्यामुळे कामांमध्ये अनिश्‍चितता निर्माण होते. ही संपूर्ण अनिश्‍चितता नष्ट करणारा सेवा हक्क कायदा आहे. या कायद्यात एखादी सेवा अधिसूचित केली की, ती सेवा ठरलेल्या वेळेत म्हणजे आठ दिवस, दहा दिवस, पंधरा दिवस अशा काळात द्यावी लागते. त्या वेळेत जर ती सेवा दिली नाही तर सेवा न देणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रति दिवस पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद कायद्यात आहे. सेवा हक्क कायद्याचा “पुणे मॉडेल’ राबविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे.

राज्य सरकारने जिल्हा परिषदांना सुरुवातीला 13 सेवा या कायद्याद्वारे देण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्यातील जिल्हा परिषदांनी या आदेशाकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु, पुणे जिल्हा परिषदेने या कायद्याचा उपयोग विचारात घेऊन 1 मे 1971 रोजी सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागरिकांना बांधकामाच्या परवानगी, गाव नमुन्यातील नोंदी, विविध प्रकारचे दाखले, तसेच कर्मचाऱ्यांच्या रजा, निवृत्तीनंतरचे वेतन यासारख्या विविध सेवांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातदेखील आणखी सेवा अधिसूचित करून दोनशेचा टप्पा पार केलेला आहे.

या सर्व सेवांची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे. मे महिन्यापासून जिल्ह्यातील नागरिकांसह कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या सेवा मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या या कामाची राज्य सरकारने स्वतःहून दखल घेत, यशवंत पंचायत राज अभिनायाच्या निमित्ताने मुंबईत येथे झालेल्या गौरव समारंभात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले आणि अधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेपर्यंत मे महिन्यापासून 4 महिन्यात सुमारे सव्वादोन लाख नागरिकांना सेवा देण्यात यश आले. त्यांच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारींचे निराकरणही करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर सेवा हक्क कायद्यान्वये कोणत्या सेवा दिल्या जात आहेत. त्या माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. दरम्यान, हा गौरव माझ्या एकट्याचा नसून, त्यामध्ये सर्व सहकाऱ्यांचे योगदान असल्याने तो सर्वांसमवेत स्वीकारला.
– सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)