देवेगौडा यांनी संपवला सस्पेन्स; तुमकूरमधून लढणार 

बंगळूर – माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष एच.डी.देवेगौडा यांनी सस्पेन्स संपवत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते कर्नाटकच्या तुमकूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आपला काही उपयोग होईल की नाही, असा विचार करत स्वत: देवेगौडा यांनीच आधी निवडणूक लढवण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली होती. मात्र, 85 वर्षीय देवेगौडा यांचे मन वळवण्यात त्यांच्या पक्षाला यश आले आहे. मात्र, देवेगौडा यांच्या उमेदवारीमुळे त्या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्‍यताही बळावली आहे.

कर्नाटकात एकत्रितपणे सत्तेवर असणाऱ्या जेडीएस आणि कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. जागावाटपानुसार तुमकूर मतदारसंघ जेडीएसच्या वाट्याला गेला असला तरी सध्या तिथे कॉंग्रेसचा खासदार आहे. ती जागा जेडीएसकडे गेल्याने स्थानिक कॉंग्रेसजन नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचे मोठेच आव्हान जेडीएस-कॉंग्रेस आघाडीपुढे आहे. त्या मतदारसंघात बंडखोरी झाल्यास त्याचा फटका आघाडीला बसू शकतो आणि त्याचा लाभ भाजपला होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)