लातूर – परशुराम जयंतीनिमित्ताने परवानगी दिलेल्या मार्गावरून रॅली न घेता औसा रोडवर रॅली घेतल्याने रॅलीचे संयोजक संजय निलेगावकर व अशोक गोविंदपूरकर यांना अटक करून तत्काळ जामिनावर सोडून देण्यात आले.
लातूर शहरातील ब्राम्हण समाजाच्या वतीने परशुराम जयंतीचे औचित्य साधून केशवराज मंदिर येथून परशुराम मंदिर परशुराम पार्क लातूर इथपर्यंत दुचाकी रॅली काढण्यास परवानगी देण्यात आली होती. सकाळी प्रत्यक्ष रॅलीस प्रारंभ झाला. ही रॅली केशवराज मंदिर, सुभाष चौक, गंजगोलाई, गांधी चौक, शिवाजी चौक इथपर्यंत आली. परशुराम पार्कपर्यंत सरळ त्यांना बार्शी रोडने परवानगी देण्यात आली होती.
पण, संयोजकांनी ही रॅली शिवाजी चौकातून राजीव गांधी चौकात नेली. ही रॅली शिवाजी चौकातून राजीव गांधी चौकाकडे जात असताना रॅलीतील कार्यकर्ते व पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुंडे यांनी परवानगी नसलेल्या मार्गावरून नेण्यास रोखले. पण, कार्यकर्त्यांनी त्यांना जुमानले नाही. रॅली राजीव गांधी चौकाला वळसा घालून परत शिवाजी चौकात आली व तेथून ही रॅली परशुराम मंदिराकडे रवाना झाली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुंडे यांनी शिवाजीनगर पोलिसांत संजय निलेगावकर व अशोक गोविंदपूरकर यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले व जामीनपात्र गुन्हा असल्याने तत्काळ सोडून दिले.