बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत सरकारकडून दिशाभूल : नवाब मलिक

ना टेंडर, ना वर्क ऑर्डर काढली

मुंबई: 2015 मध्ये बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. पण गेल्या तीन वर्षांत स्मारकाच्या कामाची कोणतीच हालचाल नाही. स्मारकाचे डिझाईन निश्‍चित झालेले नाही, ना टेंडर काढले…ना वर्क ऑर्डर काढली… स्मारकाच्या नावाखाली सरकारकडून फक्त दिशाभूल करण्याचे काम जोमात सुरु आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

-Ads-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला नवाब मलिक यांनी राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारावर टीका केली. 6 डिसेंबर असो, 14 एप्रिल… त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे खोदकाम फक्त करण्यात येते. त्याव्यतिरिक्त तीन वर्षात काहीच काम झाले नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

खरंतर यांना इंदू मिल जागेवर बाबासाहेबांचे स्मारक बांधावयाचे आहे का? हे स्पष्ट होत नाही. पंतप्रधानांनी तीन वर्षापूर्वी भूमिपूजन केले. निवडणूकीमध्ये फायदा मिळवण्यासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तरीही तीन वर्ष स्मारकाचे काम होत नाही. देशभरातील दलित भाजपविरोधात आहे, असे चित्र दिसते. त्यामुळे हे काम अडकवून ठेवण्याचा डाव भाजपचा किंवा सरकारचा आहे का, हे सरकारने स्पष्ट करावे. तसेच मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट
मंदिर-मस्जिद यांना मदत देण्याची सरकारची प्रथा असताना ही प्रथा मोडीत काढत सरकार त्यांच्या तिजोरीवरच हात मारण्याचं काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना सरकार साई संस्थानाच्या तिजोरीवर हात मारत उलट परिस्थिती निर्माण करत आहेत. सातवा वेतन आयोग देताना ही सगळी परिस्थिती पाहिली तर 5 लाख कोटीचे कर्ज या राज्यावर आहे. चार वर्षात राज्याची तिजोरी रिकामी करण्याचे काम आणि राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगासाठी पैसे सरकार कसे निर्माण करणार आहे, याबाबत लोकांच्या मनात शंका आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)