सरकारी योजनांची विरोधकांकडून बदनामी – आढळराव पाटील

मंचर – शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसह विविध योजनांचे अर्ज भरुन त्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला पाहिजे. शेतकऱ्यांना लाभ देणाऱ्या सरकारच्या विविध योजना चांगल्या असल्या तरी जिल्ह्यातील विरोधी पक्ष शासकीय योजनांचा चुकीचा अर्थ लावत आहेत. यामुळे या योजनांची विरोधकांकडून बदनामी केली जात आहे, अशी टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील बाजारपेठेत जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास दरेकर यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ आणि मार्गदर्शन मिळावे, म्हणून शिवसेना मदत केंद्र सुरू केले आहे. याचे उद्‌घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, पंचायत समितीचे सदस्य रविंद्र करंजखिले, तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक महेश ढमढेरे, मिलिंद काळे, उल्हास काळे, अजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी विकासकामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

कुठल्या गावाने किती कमी मतदान केले हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही. पुणे-नाशिक रेल्वे, पुणे-नाशिक महामार्ग, बैलगाडा हे प्रश्‍न मीच मार्गी लावणार आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांची तड लावण्यासाठी केंद्र आणि राज्यात प्रयत्न करणार आहे. आंबेगाव तालुक्‍यात भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून चारा छावण्यांसाठी चारा देण्यात आला. पुणे जिल्ह्यात विरोधी पक्ष करीत असलेल्या राजकारणामुळे शिवसेना-भाजपा सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांपासून शेतकरी वंचित राहत आहेत.

यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास दरेकर यांनी सुरू केलेले शिवसेना मदत केंद्र शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ काळे यांनी केले तर प्रशांत काळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)