राखीव कोट्यातूनच मनपा सेवेत घ्यावे
पुणे – महापालिकेकडून राज्य शासनाच्या शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंना थेट महापालिकेच्या सेवेत समविष्ट करून घेता येणार नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. खेळाडूंना पालिकेत नोकरी देण्याबाबत तत्कालीन क्रीडा समितीने ठराव करत, मुख्यसभेनेही त्यास मान्यता दिली होती. मात्र, महापालिकेच्या सेवा नियमावलीत, याबाबतची तरतूद नसल्याने सेवा नियमावलीत हा बदल करण्यासाठी पालिकेकडून शासनास ठराव पाठविला होता.
शासनाने त्यावर आपला अभिप्राय दिला असून अशा प्रकारे नियुक्ती करता येणार नसल्याचे पालिकेस कळविले आहे. हा निर्णय लवकरच क्रीडा समितीसमोर ठेवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्य शासनाकडून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
महापालिका हद्दीतील अशा खेळाडूंना पालिकेच्या सेवेत थेट समावेश करून घेण्याची तरतूद पालिकेकडून क्रीडा धोरणात करण्यात आली आहे. तसेच, याबाबतचा ठराव करूनही महापालिकेकडून तो शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्यावर अखेर शासनाने आपला निर्णय कळविला आहे. महापालिकेची स्वतंत्र सेवा नियमावली असून त्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पदे भरणे आवश्यक आहे. त्यानुसार, या खेळाडूंना थेट महापालिकेत नियुक्ती देता येणार नाही. मात्र, महापालिकेकडून वेगवेगळ्या पदांसाठी भर्ती करताना, महापालिकेने खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कोट्यातून या खेळाडूंना प्राधान्य देणे शक्य असल्याचे शासनाकडून महापालिकेस कळविण्यात आले आहे. त्यानुसार, हा शासनाचा निर्णय क्रीडा समितीच्या पुढे ठेवण्यात येणार आहे.