नोकऱ्या काढून घेण्याचे पातक केंद्रातील सरकारचे

उदयनराजेंचा घणाघात : कोरेगावमधील सभांमधून धोरणांवर हल्लाबोल

सातारा  –
पाच वर्षांपूर्वी लोकांना खोटी आश्‍वासने देऊन केंद्रात सरकार सत्तेवर आले. त्यानंतर लोकांना नोकऱ्या, खात्यावर लाख, अच्छे दिन असं काहीच हाती लागलं नाही. उलट आज त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. युवकांना नोकऱ्या तर नाहीच, परंतू ज्यांच्याकडे आहे ते काढून घेण्याचे पातक केंद्रातील सत्ताधारी सरकार करत आहे, असा हल्ला उदयनराजे भोसले यांनी आज कोरेगाव शहरातील विविध प्रचार मेळाव्यांत चढवला.

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ बुधवारी कोरेगाव शहरात दोन मेळावे झाले. त्यामध्ये ते बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे, नगरसेवक संजय पिसाळ, सारंग पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता गोरे, जिल्हा परिषद सदस्य जयवंतदादा भोसले, माजी सभापती अरुण माने, सुनील काटकर, सतीश चव्हाण, कोरेगाव पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अतूल शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

कोरेगावच्या शिवरत्न हॉलमध्ये झालेल्या बुथ कमिटीच्या शिबीरात बोलताना उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले,पाच वर्षांपूर्वी अत्यंत नियोजनबद्धपणे निवडणूक कॅम्पेन राबविली गेली. त्यात पुर्ण न होणारी आश्‍वासन देऊन जनतेची दिशाभूल केली गेली. मन की बात करुन 15 लाख रुपये खात्यात टाकणे, दोन कोटी युवकांना रोजगार, काळा पैसा परत आणणे अशा थापा मारल्या गेल्या. हे लोक सत्तेत आल्यानंतर व्हायचे तेच झाले. आश्‍वासने पाळली गेली नाहीत. देशातील लोकशाही संपूष्टात आणून हुकूमशाही सुरू झाली. आज देश आर्थिक गर्तेत अडकला आहे.

बुथ समिती सदस्यांना मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले,कोरेगाव तालुक्‍यातील मतदान उदयनराजेंना मिळेल, यादृष्टीने प्रत्येक बुथ समिती सदस्यांनी काम करायचे आहे. मनोमिलनात समेट झाला असल्याने आता प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे. कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत राष्ट्रवादीचा विचार पोहचवावा. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी घरातून बाहेर यावे, असं काम कार्यकर्त्यांना करायचे आहे.

केंद्रातील सरकारने देशात एकप्रकारे अविश्‍वासाचे वातावरण निर्माण केले आहे. ते नाहीसं करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या विचारांचे सरकार यावे लागेल. उदयनराजे केवळ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाहीत. तर राज्यातील सर्व लोकशाही मूल्यांवर आधारित विचारधारेच्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहतील, असा विश्‍वास जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी संचालक सड. जयवंत केंजळे यांनी व्यक्त केला. कोरेगावमधील व्यापारी, डॉक्‍टर्स, वकील, केमिस्ट यांच्या संघटनांच्या वतीने माहेश्‍वरी भवनात उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी श्री. छ. उदयनराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन डॉ. रमेश पाटील यांनी केले. यावेळी सड. अंकूश जाधव, रफीक शेख, अमर शिर्के, सड. अभिजीत केंजळे, प्रभाकर बर्गे, संजय झंवर तसेच डॉक्‍टर्स संघटना, वकील संघटना, केमिस्ट संघटना, व्यापारी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)