लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

338 मतदान केंद्रासाठी 2133 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

कराड – सातारा लोकसभा मतदार संघ व 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी 2019 लोकसभा निवडणूकीची संपूर्ण तयारी झाली असून मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या 338 मतदान केंद्रासाठी 2 हजार 133 कर्मचाऱ्यांची नियुुक्ती करण्यात आली आहे. तर 44 जीपसह विविध गाड्या, 6 ट्रक, 56 एसटी बस व 1 टेम्पो अशी एकूण 107 वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. मतदाराला छायाचित्र असणारे 11 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. जनतेने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर व अतिरिक्त सहा. निवडणूक अधिकारी अमरदिप वाकडे यांनी केले आहे.

विद्युत वरखेडकर म्हणाल्या, 45 सातारा लोकसभा मतदार संघ 259 कराड उत्तर विधानसभा मतदार संघात एकूण 338 मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये केंद्र क्र. 215 उंब्रज हे सखी केंद्र व केंद्र क्र. 38 अतीत हे मॉडेल केंद्र तयार करण्यात आले आहे. मतदार संघात 1 लाख 48 हजार 779 पुरुष मतदार आणि 1 लाख 41 हजार 944 महिला व मतदार असे एकूण 2 लाख 90 हजार 723 मतदार आहेत. त्यापैकी 1 हजार 789 दिव्यांग मतदार आहेत. निवडणूककामी 41 क्षेत्रिय अधिकारी, 8 राखीव क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, एक सहाय्यक केंद्राध्यक्ष, दोन सहाय्यक, शिपाई व पोलीस कर्मचारी असे एकूण 6 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. 105 कर्मचारी राखीव ठेवले असून 2028 कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.

यासाठी एकूण 438 मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामध्ये 338 यंत्रासह 100 यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच 336 बीएलओ, 309 आशा सेविका व 535 स्वयंसेवक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर आशा सेविकांमार्फत औषधांचे कीट उपलब्ध करण्यात आले आहेत. लहान बाळासह मतदानासाठी आलेल्या स्त्री मतदारांना अंगणवाडी सेविकेमार्फत 330 पाळणा घराची सोय करण्यात आली आहे.

मतदान प्रक्रियेसाठी 5 भरारी पथके, 4 स्थिर पथके (सुर्ली घाट, रहिमपूर, पुसेसावळी, तासवडे व शामगाव घाट), व्हीडीओ सर्विलन्स 8, व्हिडीओ व्हीव्हींग टीम 3 अशा एकूण 20 पथकांची नेमणूक केली आहे. मतदान यंत्रे व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी जीपसह विविध गाड्या 5, एसटी बस 56 असे एकूण 61 वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. अपंग मतदारांसाठी 133 ऑटोरिक्षांची सोय करण्यात आली असून 118 व्हीलचेअरची सोय केली आहे. येथील बहुउद्देशिय हॉल येथे मतदान यंत्र वाटप व स्विकारण्यासाठी 17 टेबल ठेवण्यात आले असून 75 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा मतदार संघातील 338 मतदान केंद्रापैकी 10 टक्के प्रमाणे सुमारे 34 मतदार केंद्रावर वेब कास्टींग ऑनलाईन यंत्रणा बसविण्यात आली असून त्यामार्फत प्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवता येणार आहे. ईव्हीएम मशिन वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस बसविण्यात येणार आहे.

मतदान करताना मतदाराला 11 छायाचित्र असणारे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये पासपोर्ट, ड्रायव्हींग, शासनाने कार्ड, बॅंक पासबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा (रोजगार) कार्ड, हेल्थ कार्ड, इन्शुरन्स कार्ड, पेन्शन कार्ड या ओळखीच्या पुराव्यांचा समावेश असल्याची माहिती देवून निवडणूक कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्यांने हलगर्जीपणा केला. अथवा आचार संहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. श्रीमती विद्युत वरखेडकर सहा. निवडणूक निर्णय अधिकारी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)