सरकार खोटे बोलुन सत्तेत आले, आता जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल – रोहीत पवार

जामखेड: चार राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे, हेच युतीचे सरकार यामध्ये अपयशी ठरले असून, मागील निवडणुकीत हे सरकार खोटे बोलुन सत्तेत आल्यामुळे येत्या निवडणुकीत जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल. आता सर्वांनी एकत्र येऊन, ही विचारांची लढाई विचारांनी लढायची असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांनी जामखेड येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले.

जामखेड येथे सोमवारी (दि. 18) सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षनिरीक्षक किशोर मासाळ, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शरद भोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, डॉ. कैलास हजारे, डॉ. इंद्रकुमार भिसे, संध्या सोनवणे, अमजद पठाण, संजय वराट, नितीन गोलेकर, अमित जाधव, डिंगाबर चव्हाण, ऍड. हर्षल डोके, डॉ. अविनाश पवार, प्रदीप पाटील, सुनील कोठारी, नरेंद्र जाधव, प्रशांत राळेभात, विजय पवार, जालिंदर राळेभात, प्रकाश काळे, बबन देवकाते, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, मराठा, मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षण देणार, अशा फसव्या घोषणा भाजप सरकारने केल्या. आरक्षणाचे गाजर दाखवले. या सर्व समाजांची फसवणूक केली. तसेच मंत्र्यांविरोधात सोशल मीडियावर पोष्ट टाकली म्हणून अवधूत पवार यांच्यावर हल्ला झाला. एवढी मोठी दहशत जामखेडमध्ये मंत्र्यांची आहे. आपल्या शंभर कार्यकर्त्यांनी हल्ला झालेल्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, तरच जामखेडमधील दहशत कमी होईल. चोंडी येथील आंदोलनातील काही आंदोलक हे शिक्षण घेत असल्याने, त्यांवरील कलम रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेदेखील रोहीत पवार यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय वारे, तर कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्षपदी मधुकर राळेभात यांची बिनविरोध निवड करण्यात येवून, या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना या निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चोंडी येथे धनगर आरक्षणाची मागणी करण्याऱ्या 17 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व आंदोलकांचा या मेळाव्यात सन्मान करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)