“गावठी मॅटर’ने 8 महिन्यात रचला इतिहास

अमेरिकेतून थेट जाधववाडीत आलं युट्युब सिल्व्हर प्ले बटण

कराड –
सध्याच्या युगात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. पण या धावपळीला आतोनात कष्टाची आणि त्या कष्टाला सातत्याची गरज असते. हीच गोष्ट पाटण तालुक्‍यातील चाफळ भागातील जाधववाडी या छोट्याशा खेडेगावातील गाववाडी प्रोडक्‍शनने आज सिद्ध करुन दाखवली आहे. युट्यूबच्या या जगात महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली “गावठी मॅटर’ या वेब सिरीजच्या संपूर्ण टीमने एक नवीनच इतिहासच रचला आहे. गाववाडी प्रोडक्‍शन या युट्यूब चॅनेलचे अवघ्या 8 महिन्यात 1 लाखांहून जास्त सभासद झाले आहेत. त्यामुळे अमेरिकेतून युट्युबकडून सिल्वर प्ले बटन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील अनेक बॉलीवुड, हॉलीवुडच्या कलावंतांना येथील निसर्ग सौंदर्याची भुरळ पडलेली आहेच. यामुळे या तालुक्‍यात अनेक वेळा विविध चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. मूळातच हा परिसर चित्रपट निर्मात्यांना भुरळ पाडत असताना आपल्याच मातीत एखाद्या वेब सिरीजची निर्मिती करण्याचा मानस ठेवून जाधववाडीसारख्या ग्रामीण भागातील कलावंताने धाडस करीत गाववाडी प्रोडक्‍शनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनजीवनाला स्पर्श करणारी “गावठी मॅटर’ ही वेब सिरीज तयार करुन आज घराघरात पोहचवली आहे. स्वप्नांची दुनिया जेवढी जास्त मोठी असते तेवढी ती पूर्ण करण्यामागची मेहनत खूपच कठोर असते.

गाववाडी प्रॉडक्‍शनचे निर्माते/दिग्दर्शक जितेंद्र अरविंद पवार या अत्यंत सामान्य कुटुंबातील कलाकाराने आपला मित्र अविनाश जाधव, पूजा संसारे, सुजाता पाटील आणि संपूर्ण गावठी मॅटर या टीमच्या सहकार्यामुळे जे यश संपादन केले आहे ते उल्लेखनीय असे आहे. अगदी कमी वेळात एवढं मोठं यश संपादन करणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. मनोरंजनातून सामाजिक संदेश देणारी गावठी मॅटर ही वेब सिरीज नवनवीन कलाकारांसाठी एक आदर्श ठरली आहे. दि. 27 फेब्रुवारी 2019 रोजी चिंतामणी कलामंच आयोजित खासदार करंडक, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. यामध्येही गावठी मॅटरच्या टीमने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. परिसरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अंगभूत कलागुण असलेल्या कलाकारांना वाव देणे हा गाववाडी प्रॉडक्‍शनचा मुख्य हेतू आहे. आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या शुन्यातून विश्‍व निर्माण करण्याच्या वृत्तीचे कौतुक केले जाते ही एक अभिमानास्पद बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)