गूड न्यूज…पेट्रोल पंपांवरही ‘सीएनजी’!

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची अधिसूचना


एका “एनओसी’वर मिळणार वितरणाचे अधिकार


अडथळ्यांची शर्यत संपून ठिकठिकाणी मिळणार “सीएनजी’

पुणे – पेट्रोल पंपावर “सीएनजी’ अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचे वितरण सुरू करण्यासाठी असणारी अडथळ्यांची शर्यत आता संपण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी काळात शहरातील प्रत्येक पंपावर सीएनजी मिळू शकणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने यासंबंधी नुकतीच एक अधिसूचना काढली आहे. यानुसार आता फक्त एका “एनओसी’ अर्थात ना-हरकत दाखल्याची  गरज असणार आहे.

साधारणत: दहा वर्षांपूर्वी शहरात “सीएनजी’चे आगमन झाले आहे. आजच्या घडीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये 49 “सीएनजी’ स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. हे सर्व स्टेशन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात “एमएनजीएल’कडून चालविण्यात येत असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरच “सीएनजी’ वितरण केले जात आहे. केंद्र सरकारने हरित इंधन या धोरणाचा अवलंब केला आहे, त्यामुळे पारंपारिक इंधनाबरोबरच इंधनाचे नवीन पर्याय शोधले जात आहेत. त्यामध्ये हरित इंधनाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार “सीएनजी’ला प्रोत्साहन मिळावे, यासाठी “सीएनजी’ पंप सुरू करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या पेट्रोल पंपावर नव्याने “सीएनजी’ वितरण करावयाचे झाल्यास, संबंधित पेट्रोल पंपचालकांना विविध पातळ्यांवरुन “एनओसी’ मिळवावी लागत होती. नव्याने एखादा पंप सुरू करताना जी कागदपत्रे द्यावी लागत होती, तीच पुन्हा “सीएनजी’ पंपासाठी द्यावी लागायची. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्याचे पंप चालकाचे म्हणणे होते. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही “सीएनजी’ वितरणाचे हक्क मिळविण्यास पुढे येत नव्हते. ही किचकट प्रक्रिया करण्यासाठी अनेक दिवस लागत होते.

या पार्श्‍वभूमीवर ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने तीन वर्षांपूर्वी पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांची भेट घेऊन या सर्व अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तातडीने हा प्रश्‍न निकाली काढला असून आता अस्तित्वात असलेल्या पेट्रोल पंपावर “सीएनजी’ वितरित करावयाचा झाल्यास केवळ संबंधित तेल कंपनीची “एनओसी’ घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले आहे अशी माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिली.

“सीएनजी’ वितरणासंदर्भात आम्ही तीन वर्षांपूर्वी केलेली मागणी पेट्रोलियम मंत्र्यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता शहरात प्रत्येक पंपावर “सीएनजी’ उपलब्ध होऊ शकणार आहे. “सीएनजी’वर धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर या पंपांची जास्तीत गरज होती. ती आता पूर्ण होणार आहे.
– अली दारुवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन.

अशी आहे पेट्रोल पंपांची संख्या
पुणे शहर- 60


पिंपरी-चिंचवड-50 


पुणे जिल्हा (ग्रामीण)- 340

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)