गुड बाय 2018 (अग्रलेख)

चालू शतकातील सर्वाधिक घडामोडींचे वर्ष म्हणून ज्याचे वर्णन करावे लागेल अशा 2018 या वर्षाचा आज सोमवारी समारोप होत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारे जग सज्ज झाले आहे. भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानात जगून भविष्यावर नजर ठेवावी असे तत्वज्ञान भारतीय विचारवंतांनी सांगून ठेवले असले तरी 2018 हे वर्ष मुळीच विसरता येण्यासारखे नाही. या वर्षात घडलेल्या अनेक घटनांचे पडसाद केवळ 2019 मध्येच नाही, तर आगामी काळात अनेक वर्षे उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक महत्वाच्या विषयांची सुरुवातच 2018 मध्ये झाली आहे. 2018 या वर्षाची सुरुवातच भीमा-कोरेगाव येथील दंगलीने झाली होती.

भीमा कोरेगाव येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक हजेरी लावतात. वर्षानुवर्षे शांततेत पार पडणाऱ्या या सोहळ्याला गेल्या वर्षी मात्र काही समाजकंटकांमुळे गालबोट लागले होते. या प्रकरणाचे मोठे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. शनिवारवाडा येथील “एल्गार’ परिषदेतील प्रक्षोभक वक्तव्यांमुळे ही दंगल घडल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला होता. आज आपण नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालो असतानाच पुन्हा एकदा हाच विषय समोर येऊन ठाकला आहे. यावेळी सरकारने संपूर्ण तयारी करुन समाजकंटकांच्या मुसक्‍या आवळल्या असल्या तरी काळजी घ्यावीच लागणार आहे. कारण हा विषय जाणीवपूर्वक पेटवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. नव्या वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच 2018 मध्ये झालेल्या निवडणूक निकालांचा परिणाम समोर ठेऊनच या निवडणुकांकडे पहावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2018 मध्ये कर्नाटक, मध्यप्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगडसह काही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातही भाजपला कशीबशी सत्ता राखता आली. कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कॉंग्रेसचा झालेला उदय महत्वाचा आहे. या निकालांचा परिणाम आगामी सर्वच निवडणुकांवर होणे अपेक्षित आहे. या निवडणुकांनी कॉंग्रेसला राहुल गांधी यांच्या रुपाने एक आश्‍वासक चेहरा नेता म्हणून लाभला.राहुल गांधी यांचे एक वेगळेच रुप या वर्षात समोर आले.सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांमधील वाद विकोपाला गेला असताना संसदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान मोदी सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता.

मोदी सरकारने हा ठराव जिंकला असला तरी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या आसनाजवळ जाऊन घेतलेली गळाभेट चांगलीच गाजली. त्यानंतर राहुल यांनी राफेल करारावरुन सातत्याने मोदी सरकारवर तीव्र टीका सुरु केली होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांच्या निकालावर झाला आणि आगामी काळातही होण्याचे संकेत आहेत. या वर्षातील सर्वात गाजलेला मुद्दा राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेचाच होता. या खरेदी प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात यासंदर्भात बंद लिफाफ्यात या कराराच्या किंमतीसह इतर तपशीलाची माहिती दिली होती. त्यानंतर ही माहिती तपासून कोर्टाने सरकारच्या बाजूने निकाल दिला होता. तरीही हा विषय संपलेला नाही. कारण हा विषय सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारितला नसून यासाठी संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी कॉंग्रेसची मागणी कायम आहे.

साहजिकच 2018 मध्ये गाजलेला मुद्दा 2019 मध्येही जिवंत ठेवण्याची रणनिती कॉंग्रेसची असणार आहे. आणखी एक महत्वाची घडामोड शबरीमला मंदिराबाबत घडली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशास परवानगी देण्याचा महत्वाचा निकाल दिला होता. पण अद्याप महिलांच्या मंदिरप्रवेशाचा प्रश्‍न कायम असल्याने 2018 मधील हा विषय 2019 मध्येही जिवंत रहाणे अपरिहार्य आहे. महिलांवरील अन्याय अत्याचाराला जाहीररित्या वाचा फोडणाऱ्या “मी टू’ या मोहिमुळे देशभरात मोठा गदारोळ माजला होता. परदेशातून सुरु झालेल्या या मोहिमेला भारतात बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सुरुवात केली होती. त्याचेही पडसाद नवीन वर्षात पहायला मिळतील. यावर्षी भारतीय राजकारणाला दिशा देणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी या दोघांचे निधन झाले.

एकूणच 2018 हे वर्ष सर्व प्रकारच्या घडामोडींने गाजलेले वर्ष ठरले. अर्थात या वर्षात या घडामोडींच्या निमित्ताने समोर आलेल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चुका आगामी काळात पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेण्याचा संदेश सरत्या वर्षाने दिला आहे. सामाजिक वातावरण ढवळून टाकून अविश्‍वासाचे वातावरण तयार करण्याचे काम या वर्षात झाले. राजकीय समाजिक लाभ मिळावा म्हणून दोन गटात संघर्ष घडवण्यासाठी सर्वचजण प्रयत्नशील राहिले.अशा चुकीच्या वातावरणाची शिदोरी घेऊन नवीन वर्षात पदार्पण करणे कोणालाच परवडणारे नाही. कवी केशवसुत यांनी आपल्या प्रसिध्द “तुतारी’ कवितेत म्हटल्याप्रमाणे, “जुने जाऊ द्या मरणालागुनी,जाळुनी किंवा पुरुनी टाका…’ ही उक्ती अंमलात आणण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच 2018 या वर्षाला गुडबाय करताना राजकीय पक्ष,सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांनीच मनावरील अविश्‍वासाचे मळभ झटकून टाकण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)