गोंदवले खुर्दचे मतदान केंद्र वॉटरकपमुळे सुनसान

पहिले प्राधान्य श्रमदानाला ः ग्रामस्थ श्रमदान करून परतल्यानंतर मतदानाला वेग

गोंदवले – गोंदवले खुर्दमध्ये सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप कामामुळे सकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रात आणि आवारात शुकशुकाट दिसत होता. खुद्द गावातील मतदार श्रमदान करण्यासाठी कामावर गेल्याने मतदान कर्मचारी फक्त आपली ड्युटी बजावत होते. यामुळे गावाने श्रमदानाला पसंती दिल्याचे दिसत होते. दरम्यान, दुपारनंतर हळूहळू मतदान केंद्रावर मतदार येवू लागले.

गोंदवले खुर्द गावाने सत्यमेव जयते वॉटर कपच्या स्पर्धेत सहभाग घेतला असून 8 एप्रिलपासून श्रमदानाचे काम सुरू झाले आहे. या काळात गावातील लोकांनी राजकारण विरहित श्रमदान करण्याचा निर्धार केला आहे. त्याप्रमाणे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये गावाने कोणताही सहभाग घेतला नाही. गावात एकही सभा किंवा गावातून रॅली निघाली नाही. गावातील सर्व लोक दररोज सकाळी सात वाजता एकत्र जमून श्रमदान करण्यासाठी कामावर जात आहेत. लोकसभा निवडणूक ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक असली तरी दुष्काळाशी लढणाऱ्या गोंदवलेकरांनी प्रथम पसंती श्रमदानाच्या कामाला दिली.

मतदानादिवशी सकाळी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र क्रं 118 आणि 119 अशा दोन खोलीत मतदानासाठी नियोजन केले होते. सकाळी साडेसात वाजल्या पासून मतदान सुरू झाले. मात्र पाहिले दोन तास गावातील सर्व लोक श्रमदानासाठी जात असल्याने मतदान केंद्रावर कोणी फिरकले नाही. जणू या गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला की काय अशी परिस्थिती दिसत होती. त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास मात्र हळू हळू काही मतदार मतदानासाठी येऊ लागले.

यावेळी गावाच्या निर्णयानुसार कोणत्याही उमेदवाराला याठिकाणी पोलिंग एजंट ठेवता येणार नाही. मतदारांना त्यांच्या मर्जीनुसार ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्याला करू द्यायचं अशी पध्दत होती. त्यानुसार पोलिंग एजंट विरहित प्रक्रिया सुरू होती. मतदान केंद्राच्या ठिकाणी खूप शांतता ठेवली होती. अपंग मतदारांना नेहण्यासाठी खास व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती. आज माढा लोकसभा मतदार संघातील गोंदवले खुर्दचे उमेदवार संदीप पोळ यांनी मतदान करून सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी मराठ्यांना आरक्षण मिळावे आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण निवडणूक लढवली असल्याचे सांगितले. गोंदवले खुर्दमध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास 2200 पैकी दोन्ही केंद्रात मिळून सुमारे 1420 मतदान झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)