सोने व्यापाऱ्याकडून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा 

डोबिंवलीतील प्रकार : फसवणूक करून सोने व्यापारी दुबईला फरार 

कल्याण  –
डोबिंवली येथील सोने व्यापाऱ्याने अधिक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळेच डोंबिवलीकर पुरते हवालदिल झाले आहेत. तो दुबईत पळून गेल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

अजित कोठारी असे या सोने व्यापाऱ्यांचे नाव आहे. डोंबिवली शहरातील तो एक नामांकित सोने व्यापारी आहे. डोंबिवलीच्या मानपाडा रोडवर प्रथमेश ज्वेलर्स नावाने त्याचे दुकान आहे. कोठारी याने ग्राहकांना अनेक ऑफर्स देत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारली होती. रोख रकमेच्या बदल्यात व्याज, तर 10 तोळे सोन्याच्या मोबदल्यात वर्षाला दोन तोळे सोने निव्वळ व्याज म्हणून देण्याचे आमिष त्याने लोकांना दाखवले. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी त्याच्याकडे मोठया प्रमाणात गुंतवणूक केली.

मात्र, अचानक प्रथमेश ज्वेलर्स बंद झाल्याचे ग्राहकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली.
पोलिसांकडे आतापर्यत 24 जणांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, बेहिशोबी पैसे आणि दागिने गुंतवणाऱ्यांची संख्याही मोठी असून अनेकांनी कोठारीकडे किलो-किलो सोने ठेवल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, ग्राहकांच्या पैशातून कोठारी याने डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि थेट दुबईतही मालमत्ता विकत घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फसवून फरार झालेल्या कोठारीला लवकरात लवकर शोधून काढावे, अशी मागणी गुंतवणूकदारांमधून केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)