नवी दिल्ली – स्थानिक पातळीवर खरेदी वाढल्यामुळे व जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे देशातील सराफा बाजारात सोन्याच्या भावात बरीच वाढ झाली. अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफात शुद्ध सोन्याचे दर 305 रुपयांनी वाढून 32,690 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर स्टॅंडर्ड सोन्याचे दर 305 रुपयांनी वाढूून 32,530 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
स्थानिक दागिने उत्पादनाबरोबरच उद्योग क्षेत्राकडून मागणी वाढल्यामुळे दिल्ली सराफत तयार चांदीचे दर 205 रुपयांनी वाढून 38,450 रुपये प्रति किलोग्रॅम या पातळीवर गेले. आगामी काळात बरेच सण येणार असल्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाली असल्याचे दिसून येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सराफा संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, देशातील दागिने उत्पादक दागिन्यांची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सोन्यावर जास्त आयात शुल्क असल्यामुळे सोने महागात पडून दागिण्यांची किंमत स्पर्धकापेक्षा जास्त होते.