‘लक्ष्य’ 100 जागांवर

देशातील सर्वांत मोठा पक्ष भाजपा आणि कॉंग्रेस यांची 2014 मध्ये कमी मत फरकाने पराभूत अथवा विजयी झालेल्या जागांवर जोर लावण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांकडून साधारणतः 80 हजारांचा मतफरक असलेल्या जागांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. या जागांवर काहीही झाले तरी विजय मिळवायचाच असा चंग दोन्ही बाजूंनी बांधला गेला आहे. यानिमित्ताने यासंदर्भातील आकडेवारी आपण पाहूया.

2014 च्या निवडणुकीत देशभरातील एकूण 224 जागांवर निकालांनंतर कॉंग्रेस दुसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून आले होते. याखेरीज गतवेळी देशभरात अशा 56 जागा आहेत जिथे कॉंग्रेस 80 हजारांहून कमी फरकाने पराभूत झाली होती. तसेच 24 जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले होते. यंदा या जागांवर बारकाईने लक्ष दिले जाणार आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने गत लोकसभा निवडणुकीत 282 जागांवर दणदणीत विजय मिळवून पक्षाच्या वाटचालीतील ऐतिहासिक कामगिरी केली. तथापि, 146 जागांवर भाजपाचे उमेदवार विरोधी उमेदवारांकडून पराभूत झाले. तसेच 82 जागांवर भाजपाच्या उमेदवारांना विजयी उमेदवारांपेक्षा 20 टक्‍के मते कमी मिळाली. भाजपा यंदा प्राधान्याने या जागांवर अधिक जोर देणार आहे.

दोन्हीही पक्षांकडून सध्या तोडफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. दोन्हीही पक्षांसाठी यंदा 100 जागा निर्णायक ठरणार आहेत, जिथे विजयी आणि पराभूत उमेदवारांतील अंतर केवळ 10 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. कॉंग्रेसचा विचार करता कॉंग्रेस यंदा उधमपूर, खडूर साहब, सहारणपूर, करौली ढोलपूर, लोहरदगा, रांची, महासमुंद, आणंद, सांवरकांठा, धार, नंदुरबार, दादरा नगर हवेली, दावणगिरी, बेळगाव, कुशीनगर, रायगंज, मांडया, कोप्पल, बेलगाम, सासाराम, लक्षद्वीप, त्रिशूर, विजापूर, कासरगोड या जागांवर अधिक फोकस करताना दिसत आहे. या मतदारसंघात गत निवडणुकीत चुरशीचा मुकाबला झाला होता.

देशभरात एकूण 23 जागा अशा आहेत जिथे केवळ एक टक्‍क्‍यांच्या फरकाने विजय-पराजयाचा निर्णय झाला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे चार जागा कर्नाटकात आहेत. त्यापाठोपाठ तीन केरळमध्ये आहेत. तर आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालमध्ये दोन-दोन जागा आहेत. जम्मू-काश्‍मीर, झारखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात अशी एक-एक जागा आहे. या 23 जागांचा तपशिलात जाऊन अभ्यास केल्यास विजयी आणि पराभूत उमेदवारांना मिळालेल्या मतांमधील फरक हा 36 पासून 11178 पर्यंत आहे. त्यामुळेच दोन्हीही पक्ष यंदा या 23 जागांवर सर्वाधिक भर देणार आहेत. यापैकी सहा-सहा जागा भाजपा आणि कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. तर तीन जागा माकपाने जिंकल्या आहेत. बिजू जनता दलाने दोन, तर राजद, लोजपा, जेडीएस, शिवसेना, तेलगू देसम पार्टीने एक-एक जागा जिंकली आहे. एक टक्‍क्‍यांच्या मतफरकाने विजय-पराजय झालेल्या या 23 पैकी 17 जागांवर मतदान जवळपास 70 टक्‍के झालेले होते, हे विशेष. त्यामुळेच या लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्‍का वाढण्याच्या फारशा शक्‍यता नाहीत. अशा वेळी एकमेकांचे मतदार आकर्षित करून घेण्यावाचून पक्षांपुढे पर्याय नाही.

या 23 जागांवरील उमेदवारांमध्ये कॉंग्रेसचे एम. वीरप्पा मोईली, शिवसेनेचे अनंत गीते आणि माकपाचे मोहम्मद सलीम यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. 2014 मध्ये विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील मतांमध्ये सर्वांत कमी अंतर जम्मू-काश्‍मीरमधील लडाख लोकसभा मतदारसंघात होते. तेथे विजयी झालेल्या भाजपा उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा केवळ 36 मते जास्त मिळाली होती. छत्तीसगडमधील महासमुंद लोकसभा मतदारसंघातही भाजपा उमेदवाराने केवळ 1217 मतांच्या मताधिक्‍याने विजय नोंदवला होता. ही निवडणूक भाजपाचे चंदूलाल साहू आणि अजित जोगी यांच्यात झाली होती. कर्नाटकातील रायचूरच्या जागेर कॉंग्रेसच्या के.बी.वी. विनायक यांनी भाजपाच्या के. ए. शिवनगौडा नायक यांना केवळ 1499च्या मताधिक्‍याने पराभूत केले होते. लक्षद्वीपमधील जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार मोहम्मद फैजल यांनी हमदुल्ला सईद यांना 1535 मतांनी पराभूत केले होते. महाराष्ट्रातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा 1632 मतांनी पराभव केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)