पणजी – गोव्यातील प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पाठिंबा आपण काढून घेत आहोत, असे गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज जाहीर केले. राज्य सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र सरदेसाई यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पाठवले आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या राजकीय व्यवहार कमिटी आणि विधीमंडळ पार्टीची बैठक आज झाली आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्या जागेवर कॉंग्रेसचे बंडखोर नेते आणि विरोधीपक्ष नेते चंद्रकांत कवळेकर यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. कवळेकर यांच्यासह जेनिफर मोन्सेरात आणि फिलीप नेरी रॉड्रीग्ज या कॉंग्रेसच्या बंडखोरांसह भाजपच्या मायकेल लोबो यांना आज राज्यपालांनी मंत्रीपदाची शपथ दिली.
मुख्यमंत्री सावंत 10 जुलै रोजी 10 आमदारांसह दिल्लीत भाजप कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ आता 5 झाले आहे.