जखमी उदमांजरास प्राणीमित्रांकडून मिळाले जीवदान

कामेरी जवळील रोपवाटिका परिसरात आढळला दुर्मीळ प्राणी

इस्लामपूर -कामेरी, ता. वाळवा येथील कृषी भूषण हायटेक रोपवाटिका जवळ जखमी अवस्थेत पडलेल्या उदमांजर जातीच्या दुर्मीळ प्राण्याला महाराष्ट्र ऍनिमल रिट्रायविंग असोसिएशनच्या प्राणी मित्रांनी उपचार करून जीवदान दिले.
कामेरी जवळ राष्ट्रीय महामार्ग चारला लागून असलेल्या लालासो गुरव यांच्या कृषी भूषण हायटेक रोपवाटिकेच्या उजव्या बाजूला एक लहान दगडी रस्ता आहे.

याठिकाणी दत्ता भोसले यांना हा उदमांजर जातीचा प्राणी जखमी अवस्थेत दिसला. तत्काळ त्यांनी महाराष्ट्र ऍनिमल रिट्रायविंग असोसिएशनच्या इस्लामपूर शाखेच्या प्राणीमित्रांशी संपर्क साधला. तेव्हा संस्थेचे अध्यक्ष प्राणीमित्र विकास माने, विवेक शेटे, शिवराज पाटील, संदीप क्षीरसागर व किरण नलवडे याठिकाणी आले. रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एखाद्या वाहनाच्या धडकेने या प्राण्याला जोराची धडक बसून त्याला मार लागल्याने त्याची मागील बाजूची हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्याला इस्लामपूर येथील जनावरांच्या सरकारी दवाखान्यात आणून उपचार केले व वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले.

तपकिरी उदमांजराला इंग्रजीत कॉमन पाल्म केव्हीट असे संबोधले जाते. म्हणतात. तर त्याच शास्त्रीय नाव पॅराडॉक्‍शुरस हेरमाफ्लोडीस असे आहे. हा सस्तन व मांसाहारी प्राणी असून वायविरिडी या कुळातील आहे. हा प्राणी निशाचर असल्यामुळे दिवसा सहसा दिसत नाही. याची लांबी 42 ते 69 से. मी. च्या आसपास असून वजन 3 ते 5 किलोपर्यंत असते. याचे वास्तव्य जंगलासोबत मानवीवस्तीजवळ ही असते. हा एकाकी जगणारा प्राणी आहे. हा झाडावरती ही चडू शकतो. हा मुख्यत: मांसाहारी असून उंदरासारखे लहान प्राणी, लहान पक्षी, कीटक, बेरी हे याचे खाद्य आहे. कोकणात भेरली माडाची फळे हे प्राणी आवडीने खातात. अशी माहिती प्राणीमित्र विकास माने यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)