महामेट्रोला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या

पिंपरी  – दापोडी ते निगडी या महामेट्रोच्या मार्गाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी मातंग समाज बांधवांनी केली आहे. याशिवाय शहरातील अण्णाभाऊ साठे आणि वस्ताद लहुजी साळवे यांच्या पुतळ्यांची डागडुजी करण्याची मागणीदेखील करण्यात आली.

महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाची नियोजन बैठक गुरुवारी (दि.11) महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीला उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी ही मागणी केली. या बैठकीला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे विकास विकास महामंडळाचे सदस्य मनोज तोरडमल, शर्मिला बाबर, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, कमल घोलप, नगरसेवक तुषार हिंगे आदी उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. ते मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 50 लाख रुपयांची तरतूद करावी. पारंपारिक वाद्य असलेल्या बॅण्ड व हलगीर्साख्या वाद्यांची स्पर्धा आयोजित करावी. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित असलेले चित्रपट महापालिकेच्या तीनही प्रेक्षागृहांमध्ये दाखवावेत.

महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे नामकरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती असे करावे. चिंचवड स्टेशन येथील वस्ताद लहूजी साळवे यांच्या पुतळ्याला मेघडंबरी बसवावी. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वाटप करावे. शिक्षण विभागाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित निबंधस्पर्धा आयोजित करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

महापौर राहूल जाधव म्हणाले, सर्व समाज बांधवांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व शहर वासियांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. पवनाथडी व भीमथडी जत्रेच्या धर्तीवर वाटेगाव जत्रा, अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव, पारंपारिक स्पर्धांचे नियोजन करण्याबाबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. अण्णाभाऊंचे साहित्य व त्यांचे कार्य सर्वसमावेशक होते, असे ते यावेळी म्हणाले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भवाळ, सुनील भिसे, धनंजय भिसे, युवराज दाखले यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनीही अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाबाबत सूचना मांडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)