नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघ चौथ्या क्रमंकावर चांगली फलंदाजी करु शकेल अशा फलंदाजाच्या शोधात असून त्या क्रमांकावर भारतीय संघ व्यवस्थापनाने आठ-नऊ फलंदाजांना वापरुन पाहिले आहे. मात्र, आता पर्यंत त्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करु शकेल असा फलंदाज संघाला सापडलेला नाही. त्यातच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने चौथ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा खेळवण्याचा सल्ला दिला आहे.
यावेळी बोलताना गांगुली म्हणाला की, माझ्यासाठी चेतेश्वर पुजाराला एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्यायला हवी. त्याचे क्षेत्ररक्षण जराशे ढिसाळ असले तरीही तो एक चांगला फलंदाज आहे. अनेकांना हा पर्याय योग्य वाटणार नाही.
मात्र तुम्हाला संघात एका चांगल्या आणि तंत्रशुद्ध फलंदाजांची गरज आहे, तर सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपेक्षा पुजारा या जागेसाठी योग्य उमेदवार ठरतो. असे म्हणताना गांगुलीने पुढे सांगितले की, ज्या प्रमाणे राहुल द्रविड याआधी भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावायचा, त्याचप्रमाणे पुजाराही तशीच भूमिका बजावू शकतो असे त्याने यावेळी सांगितले.