रोहित पवारांना कर्जत-जामखेडमधून उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांची शरद पवार यांच्याकडे मागणी

जामखेड: रोहित पवारांना उमेदवारी द्या, ते 100 टक्के निवडून येतील, अशी मागणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. यावर शरद पवार हसत ‘तुझी मागणी झाली बघ’ असं रोहित पवार यांना म्हणाले.

सोमवारी (दि.13) जामखेडहून आपल्या नियोजित मराठवाडाच्या दुष्काळी दौऱ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निघाले असता, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दहा मिनीटे ते जामखेड येथे थांबले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि रोहित पवारांना उमेदवारी देण्याची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, बीड लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषद सतिष शिंदे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून रोहित पवार हे कर्जत-जामखेडकडे विशेष लक्ष देत असून, त्यांनी दुष्काळी भागासाठी 80 टॅंकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. दोन दिवसापूर्वीच रोहित पवार जामखेड दौऱ्यावर असताना त्यांनी जामखेड तालुक्‍यातील यांनी जवळा, राजेवाडी, खांडवी, भुतवडा तलाव, हापटेवाडी, पाटोदा व जामखेड येथे भेट देत कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केले. कर्जत तालुक्‍यातही रोहित पवारांचा दौरा करून साखरपेरणी केली आहे, त्यामुळे आगामी विधानसभेसाठी कर्जत-जामखेडमधून रोहित पवार हे निवडणूक लढवतील अशी दाट शक्‍यता आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दुष्काळी दौऱ्यावर असताना, जामखेडमध्ये कार्यकर्त्यांनी थांबवून रोहित पवार यांना कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्याच, अशी मागणी केली. यावर शरद पवार यांनी दिलखुलासपाणे हसत-हसत रोहित पवारांकडे पाहून, बघ तुझी मागणी झाली असे म्हणाले. त्यामुळे रोहित पवार हे कर्जत-जामखेडमधून आगामी विधानसभा लढवतील असे संकेत देण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)