निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी द्या

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही. निष्ठावान व सच्चा शिवसैनिकालाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे, असा ठराव साताऱ्यात झालेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हा ठराव सादर केला जाणार आहे.

संपर्क नेत्यांसमोरच धुसफूस

व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव बोलले. यानंतर प्रा. नितीन बानुगडे-पाटील बोलायला उठणार होते, तेव्हाच एस. एस. पार्टे यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा प्रोटोकॉलनुसार तुम्ही आधीच बोलायला पाहिजे होते, असे स्पष्टीकरण जाधव यांनी केले. तरीही पार्टे काही वेळ बोलले. संघटनेचे काम करताना निष्ठावान शिवसैनिकाच्या घरावर कौले राहिली नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी साताऱ्यात पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार बाबुराव माने, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय मोहिते, उपाध्यक्ष सचिन मोहिते, दिनेश बर्गे, प्रताप जाधव आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी माजी आमदार बाबुराव माने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच प्रा. बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, एस. एस. पार्टे, नरेंद्र पाटील यापैकी एकाला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांमधून करण्यात आली. प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले,शिवसेनेने भाजपशी राष्ट्रहिताच्या मुद्‌द्‌यावर युती केली आहे. 1996 च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली असून सर्व शिवसैनिकांनी गतीने कामाला लागावे. बुथ कमिट्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.

लोकसभेचा उमेदवार कोण? हे दोन दिवसांत मातोश्रीवरुन घोषित होईल. उमेदवार कोण हे महत्त्वाचं नाही, लोकसभेत शिवसेनेचा खासदार जाणं हे महत्त्वाचं आहे. सर्वांसाठी युध्दाचा काळ सुरु झाला आहे. चंद्रकांत जाधव म्हणाले, ह्यलोकसभा निवडणुकीची उमेदवारी निष्ठावान शिवसैनिकाला मिळावी, ही सर्वांची मागणी आहे. बाहेरचा उमेदवार यायचा…आमचा वापर करुन जायचा, असं आता होता कामा नये. धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार आहे. पक्षाला घातक अशा चर्चा कोणीही करु नये, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे वागू नका. उमेदवार घोषित केल्यानंतर त्याच्या प्रचाराच्या कामाला सर्वांनी लागायचे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)