देशावर वाईट नजर टाकणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर द्या!

हवाई दलाच्या एअर स्ट्राईकवर विधिमंडळात अभिनंदनाचा वर्षाव

मुंबई – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्‌याला प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे पाकिस्तानात घुसून ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्‌वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलावर आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. भारतीय वायुसेनेने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारतावर वाईट नजर टाकणाऱ्यांना अशाच पद्धतीने चोख उत्तर मिळाले पाहिजे, अशा शब्दात सत्ताधारी व विरोधकांनी आपली भूमिका मांडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारतीय सेनेने दिल्यानंतर त्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उमटले. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतीय सैन आणि वायुदलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे. सैन्य आणि वायू दलाने पाकव्याप्त काश्‍मिरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बफेक करून ते नेस्तनाबुत केले आहे. भारत हा कमजोर देश नसून जगातील इतर मजबूत देशांपैकी एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले आहे. भारतीय म्हणून ही सर्वांसाठी गौरवाची बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्यावतीने सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

देशावर कोणी वाईट नजर टाकत असेल तर त्यांना असेच चोख उत्तर मिळाले पाहिजे. भारतीय सेनेने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भारतीय सेनेने केलेल्या हल्ल्याचे कौतुक केले. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा आम्ही 125 कोटी भारतीय एक असल्याचे दाखवून दिले आहे. यात आम्ही एक भारतीय नागरिक म्हणून सहभागी आहोत असे पवार म्हणाले. तर पुलवामा घटनेनंतर ठोस उत्तर देण्याची गरज होती. आज भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या घरात घुसून कारवाई केली. या घटनेचे कॉंग्रेस पक्षाच्यावतीने अभिनंदन करतो, असे कॉंग्रेसचे आमदार नसीम खान म्हणाले. या घटनेमुळे देशवासियांची छाती भरून आल्याचे सांगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले तसेच आता पुन्हा आणखी एक तुकडा करण्याची गरज असल्याच खान म्हणाले.’

आमची छाती 56 इंचाची झाली

भारतीय वायु दलाचे कौतुक करताना शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी सीमेवरील जवान आमचा आत्मा असून आज आमची छाती 56 इंचाची झाल्याचे म्हणाले. तर समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी देशातील जवानांना सॅल्युट करताना ‘पाकिस्तानवाले होश मे आओ,’ नाहीतर जगाच्या नकाशावरून गायब व्हाल, असा संताप व्यक्त करीत सैन्यदलाचे अभिनंदन केले. शेकापचे आ. गणपतराव देशमुख यांनीही जवानांचे अभिनंदन केले.

भारतीय सैन्य क्षमतेची झलक

आजची भारताच्या सैन्यक्षमतेची केवळ झलक आहे. या ट्रेलरनंतर पिक्‍चर कधी रिलीज करायचा हे सैन्याचे नेतृत्व योग्यवेळी ठरवेल अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत अभिनंदन केले. भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुझाहिद्दीन, लष्करे-ए-तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले असल्याचे मुंडे म्हणाले. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु या हल्ल्याचे कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष भारतीय सैन्यांच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)