पुणे – पुण्यातून भाजपकडून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल

– कॉंग्रेसचा उमेदवार कोण? ; “सस्पेन्स’ कायम
 
पुणे – गेले काही दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपने अखेर गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करुन ही उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर गेले काही दिवसांपासून सुरू असणारे संजय काकडे यांचे बंड सुद्धा थंड करण्यात पक्षाला यश आले आहे.
भाजपने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात राज्यातील चार उमेदवारांचा समावेश आहे. बापट यांच्यासह बारामतीतून आमदार राहुल कूल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली. बापट यांची उमेदवारी जाहीर होताच सकाळपासूनच बापट यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी बापट हे भाजपच्या सन्मान हॉटेलमधील कार्यालयात आले. यावेळी शहराच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनीसुद्धा बापट यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.

भाजपच्या काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात येण्याची चर्चा होती. त्यात पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचेसुद्धा नाव होते, अशी चर्चा होती. त्याचबरोबर सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे हे सुद्धा भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. भाजपकडून तिकीट मिळणार नाही, म्हणून ते कॉंग्रेसच्या नेत्यांकडे गेले होते. शिवाय राष्ट्रवादीबरोबर सुद्धा त्यांनी सूत जुळविले होते. अखेर मुख्यंमत्र्यांनी त्यांची नाराजी दूर करुन त्यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी टाकली. त्यामुळे आता त्यांनी पक्षाचे काम करण्यास सुरूवात केली आहे. या सर्वांचा फायदा हा बापट यांना मिळणार आहे, अशी चर्चा आहे.

दरम्यान, भाजपने आपला उमेदवार जाहीर केला असला, तरी प्रमुख विरोध पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नसल्यामुळे बापट यांच्या विरोधात कोण? हा “सस्पेन्स’ मात्र कायम आहे. दरम्यान, “उमेदवारी दिल्याबद्दल भाजप नेतृत्व, रिपाइं, शिवसंग्राम आणि शिवसेना नेत्यांनासुद्धा धन्यवाद देतो. माझ्या उमेदवारीमुळे याचे तिकीट कापले, त्याला डावलले ही भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही. तिकीट देताना गुणवत्ता आणि मेरिट पाहिले जाते. त्यातून उमेदवारांची निवड पक्ष नेतृत्व करते,’ असे बापट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

पुण्याची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होईल. ही विचारांची लढाई आहे, विचारांनीच लढली जाईल. कुठेही अशांतता होता कामा नये. आम्ही आमचे विकासाचे मुद्दे घेऊन लोकांपुढे जाणार आहोत. विरोधकांनी सुद्धा त्यांच्या विकासाचे मुद्दे घेऊन पुढे यावे. माझी जमेची बाजू ऐवढीच आहे, की हजारो सक्षम कायकर्त्यांची “ऍसेट’ माझ्याकडे आहे, हीच माझी व पक्षाची ताकद आहे. मला याच कार्यकर्त्यांची मदत होणार आहे आणि मी मोठ्या मतधिक्‍याने विजयी होईल.

– गिरीश बापट, लोकसभा उमेदवार, भाजप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)