आहेर

हल्ली लग्नपत्रिकेत ओळ छापलेली असते, ती म्हणजे “कृपया आहेर, गुच्छ आणू नये. आपली उपस्थिती हाच आमचा आनंद.’ पण ही “आहेर’ देण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे. अगदी राजे राजवाड्यांच्या काळापासून. तेव्हा त्याला “नजराणे’ म्हणत. विवाह समारंभात इतर सर्व राजांना निमंत्रणासोबत असे नजराणे पाठवित असत. पुढे पुढे सर्वसामान्य लोकांच्याही लग्नकार्यात ही पद्धत रूढ झाली असावी.

पुढे काळ बदलला तरी ही आहेराची पद्धत चालूच राहिली. कालानुरुप त्यात खूप बदल होत गेले. परंतु, ही पद्धत चालूच राहिली. देण्या-घेण्याच्या साड्या आणि इतरही वस्तू बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. म्हणजे त्या नुसत्या द्यायच्या किंवा घ्यायच्या, परंतु नेसायच्या मात्र नाहीत. यातून कोणाला आणि कसा आनंद मिळाला माहीत नाही. परंतु अशा दुकानदारांचे मात्र भले झाले. साड्यांच्या किमती वाढू लागल्या तसे मध्यंतरीच्या काळात स्टीलची भांडी देण्याचे एक फॅड आले होते. वधू-वरांशेजारी एका खुर्चीत आलेले आहेर गोळा करण्यासाठी एका “खास’ माणसाची नियुक्ती केलेली असे. घरात भांड्यांचे ढीग जसे वाढू लागले आणि प्लॅस्टिकचा जमाना जसा सुरू झाला तशी वस्तूंमध्ये विविधता आली. त्याबरोबर काचेच्या वस्तूंचाही वापर होऊ लागला. त्यानंतर नॉनस्टिक भांड्यांचा एक जमाना आला. मग घरामध्येही त्या वस्तूंची संख्या दोन, चार अशी वाटू लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मधेमधे बेडशीटची चलती होती. पण निदान ती घरात खूप लागतातही. शक्‍य आहे ते सोने, चांदी , फ्रीज, वॉशिंग मशिन, टी.व्ही. फर्निचर याही वस्तूनात्यांमधील ओलाव्याप्रमाणे दिल्या जात. आणखीही काही राहिल्या असतील. परंतु, “आहेर’ देण्यामागची संकल्पना काही बदलली नाही. या “आहेरा’वरून बऱ्याच कार्यात मान-अपमानाची नाट्येही घडत. जास्त आहेर देणाऱ्यांविषयी जास्त प्रेम दाखविणे, इतरांना कमी लेखणे असेही प्रकार घडत. परंतु “आहेर’ देणे या मागची भावना खरी चांगली आहे. ज्या व्यक्तींकडे कार्य आहे तिला मदत होणे आणि तिच्यावरील आपले प्रेम व्यक्त होणे खरेतर वस्तूमध्ये प्रेम नसते. पण त्यामागची भावना प्रेमाची असते. पण हळूहळू यामध्ये एक कोरडेपणा आला. प्रेमाची भावना कमी होऊन, व्यवहार आला. वस्तूंची संख्या घरातच वाढल्याने, त्यातील नाविन्य कमी झाले. उलट आलेल्या वस्तूंचे काय करावे हा मोठा प्रश्‍न होऊ लागला आणि मग त्यातला फोलपणा हळूहळू कळून येऊ लागला.

प्रेम हे फक्त काही देण्या-घेण्यात नाही तर ते आंतरिक असावे लागते. ते असे वस्तूंनी सिद्ध होत नाही आणि म्हणूनच आताच्या लग्नातील ती शेवटची ओळ लिहिली जाऊ लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)