घाटमाथा पाटण ते कराड राष्ट्रीय महामार्ग कामास गती द्यावी

आ. शंभूराज देसाई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सणबूर – पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत सुरू असणाऱ्या घाटमाथा हेळवाक – पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गत दीड वर्षापासून संथ गतीने सुरु असल्याने मतदारसंघातील नागरिकांना व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती देण्याच्या व या रस्त्याचे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी बहुतांशी काम हे पुर्णत्वाकडे नेण्याच्या सक्त सूचना देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी आ. शंभूराज देसाई यांनी लेखी पत्राव्दारे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत गुहागर, चिपळूण, कराड, जत, विजापूर या महामार्गावरील पाटण विधानसभा मतदारसंघातील घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आले आहे. गत दीड वर्षापूर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास एल अँन्ड टी कंपनीने सुरुवात केली असून सदर कंपनीने या रस्त्याची खुदाई केली आहे. खुदाईमुळे वाहन धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने वारंवार राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच संबधित एल अँन्ड टी कंपनीचे जनरल मॅनेजर व प्रोजेक्‍ट मॅनेजर यांच्या संयुक्त बैठकाही घेण्यात आल्या आहेत. तरीही या कामास गती देण्यात आली नाही.

पाटण मतदारसंघाला जोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्याचे 40 टक्केही काम पुर्ण झाले नाही. पावसाळा येण्यास दोन महिन्यांचा कालावधी राहिला असून पावसाळ्यापूर्वी या राष्ट्रीय महामार्गाचे बहुतांशी काम पूर्ण न झाल्यास मतदारसंघातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने संबधित कंपनीकडे अजूनही दोन महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये बहूतांशी रस्त्याचे काम पूर्ण करण्यास या कंपनीस वाव आहे. सदरचे रस्त्याच्या कामास प्राधान्याने गती द्यावी. याकरीता आपणांकडून संबधित यंत्रणांना सक्त सूचना होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत गुहागर, चिपळूण, कराड, जत, विजापूर या महामार्गावरील पाटण विधानसभा मतदार संघातील घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे कामास प्राधान्याने गती देवून या रस्त्याचे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी बहूतांशी काम हे पुर्णत्वाकडे नेण्याकरिता आपणाकडून संबधित यंत्रणांना सक्त सूचना करण्यात यावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)