माजी मंत्री शरद पवार यांची ग्वाही
भुईंज – खंबाटकी घाटात होत असलेल्या नव्या बोगद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. मात्र, हा बोगदा होणेदेखील महत्वाचे असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांना योग्य न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही माजी मंत्री खा. शरद पवार यांनी दिली.
नवी दिल्ली येथे खा. शरद पवार यांची भेट घेऊन नवीन खंबाटकी बोगद्याच्या भूसंपादनाबाबत वाई पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप यांनी चर्चा केली. यावेळी वाण्याचीवाडी, खंडाळा, वेळे व इतर गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी खा. शरद पवार यांना सांगितल्या. राष्ट्रीय महामार्गासाठी खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी, खंडाळा, वेळे गावच्या शेतजमिनींचे नव्या बोगद्यासाठी भूसंपादन करत असताना बरेचजण भूमिहीन, अल्पभूधारक होणार आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
प्रकल्प महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हित पाहणे महत्वाचे आहे. नवा खांबाटकी बोगदा होणे आवश्यक असले तरी त्यासाठी होणाऱ्या भूसंपादनात शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. जमिनींचे गुंठ्याला दिलेले दर कमी असल्याने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. अधिकाऱ्यांनी भूसंपादन करताना शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवावी. महामार्गालगतचा 500 मीटर परिसर धरून प्रतिगुंठा 10 लाख रुपये दर शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळावा, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांच्यावतीने अनिल जगताप यांनी पवार साहेबांकडे केल्या. खा. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.