विस्मरणावर करा मात (भाग १)

डॉ. एस. एल. शहाणे 
स्मरणशक्ती कमी होणे म्हणजे वाढत जाणारा विसराळूपणा ही एक गंभीर समस्या आपल्या समाजात येत आहे. वाढते वय आणि वृद्धांची संख्या हे त्याचे प्रमुख कारण आहे. या आजाराने अनेक व्यक्ती एक प्रकारे अपंग होतात. हळूहळू दैनंदिन व्यवहार करणेही अवघड व्हायला लागते. या विकारामागे काही वेगवेगळी कारणे आहेत. रक्तप्रवाह कमी झाल्याने विस्मरण उतारवयात मेंदूचा रक्तप्रवाह कमी व्हायला लागतो. एकूणच शरीरात रक्तवाहिन्या अरुंद होत असतात, त्यात छोटे मोठे अडथळे येत राहतात, सूक्ष्म रक्तस्राव होत राहतात. शरीरात अनेक इंद्रियांत यामुळे बिघाड होतात. मात्र, मेंदूत रक्त प्रवाहातले अडथळे खूप नुकसानकारक असतात. मेंदूत विशिष्ट कामासाठी विशिष्ट जागा ठरलेल्या असतात. याच कारणाने पक्षाघातही होतो. मात्र, पक्षाघातासाठी अचानक मोठा अडथळा कारणीभूत ठरतो. 
विस्मरण व मानसिक क्षीणता अनेक सूक्ष्म अडथळ्यांमुळे येते. अल्झायमरचा विकार हा विकार उतारवयातच येतो. यामध्ये विस्मरण, स्थळ काळाचे भान कमी होणे, मूड बदलणे, वाक्‍ये न बोलता येणे, परत परत तेच शब्द येणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे, आणि एकूण भ्रमिष्टपणा ही वाढती लक्षणे दिसून येतात. शब्दसंपत्ती कमी होत जाते. वाक्‍यरचना तुटक होते आणि शेवटी व्यक्ती मूक होते. पुढेपुढे दैनंदिन व्यवहार – खाणे, पिणे, स्वच्छता, कपडे घालणे वगैरे गोष्टीपण अवघड होत जातात. हळूहळू व्यक्ती परावलंबी होतात. या आजारात साधारणपणे आठ प्रकारे बौद्धिक कमतरता निर्माण होतात. स्मरणशक्ती कमी होते. भाषाकौशल्य कमी होते लक्ष (ध्यान नसणे) समज कमी होत जाते.
रचनात्मक बुद्धिकौशल्ये कमी होतात. भान-स्थळ, काळ, ओळख कमी होते. समस्या-सोडवणुकीची क्षमता कमी होते. कार्य-कुशलता कमी होते. शेवटी शेवटी असा माणूस पूर्णपणे मनविरहीत आणि परावलंबी होतो. ही परिस्थिती घरात सर्वांनाच दु:ख व पीडादायक असते. निदान झाल्यानंतर साधारणपणे 7-8 वर्षांत मृत्यू येतो. या विकाराचे मुख्य कारण म्हणजे मेंदू आकसत जातो व अकार्यक्षम होतो. मेंदूतले सूक्ष्म तंतू एकमेकात गुंतून जाळी तयार होतात. मेंदूत एका सदोष प्रथिनाचे प्रमाण वाढत जाते. रक्तवाहिन्यांमध्ये देखील थर जमायला लागतात. यामुळे रक्तप्रवाहाची कुचंबणा होते. अल्झायमर प्रतिबंध या आजाराबद्दल संशोधनाने थोडी थोडी माहिती उपलब्ध होत आहे.
काही प्रतिबंधक मुद्दे 
आहारात गंजरोधक पदार्थ (फळे, भाजीपाला, मासे, योग्य तेले आणि रेड वाईन) असण्याने काही प्रमाणात आजार टळतो किंवा पुढे ढकलला जातो. जिरे आणि हळद ही या दृष्टीने उपकारक ठरतात असे दिसते.
मधुमेह, अतिरक्तदाब, रक्तात कोलेस्टेरॉलचे जास्त प्रमाण, धूम्रपान हे सर्व या आजाराची शक्‍यता वाढवतात. या आजारांचा प्रतिबंध करायला पाहिजे.
सौम्य प्रमाणात ऍस्पिरिनचा वापर उपकारक असेल असे दिसते. यामुळे हा आजार होणे टळते किंवा लांबणीवर पडते.
बौद्धिक खेळाने (उदा. बुद्धिबळ, शब्दकोडी) या आजाराचा काही प्रमाणात प्रतिबंध होतो असे दिसून आले आहे. तसेच संगीत, सामाजिक कार्यक्रमात सहभाग, द्विभाषिक व्यवहार, इ. मुळे आजाराचा थोड्याफार प्रमाणात प्रतिबंध होतो.
काही धातू व रसायनांमुळे हा आजार संभवतो असे दिसते. स्वयंपाकात अधिक अल्युमिनियमचा वापर (विशेषत: तवा, कढई) या दृष्टीने घातक आहे. रंगात वापरली जाणारी सॉल्वंट रसायनेही या आजाराला आमंत्रण देतात असे दिसते. भारतात या आजारावर योगासने, प्राणायाम, ब्राह्मी वनस्पती यावर प्रयोग चालू आहे. व्यवस्थापन या आजारावर नक्की औषधे अद्याप मिळालेली नाहीत. काही औषधांचा वापर केला जातो, पण उपयोग मर्यादित आहे. याशिवाय काही मानसोपचारांचा अभ्यास चालू आहे. घरातल्या इतर व्यक्तींवर या आजारी माणसाची विशेष जबाबदारी येऊन पडते.
विस्मरणावर करा मात (भाग २)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)