जंटलमन्स गेम?

क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो म्हणूनच या खेळाला जंटलमन्स गेम असे म्हटले जाते. जगभरातील अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी आपल्या मैदानावरील वर्तणुकीतून एक आदर्श घालून देत या खेळाची प्रतिष्ठा वाढवण्याचेच काम केले आहे. आपल्या वर्तणुकीने क्रिकेटला गालबोट लागणार नाही क्रिकेटची जंटलमन्स गेम ही ओळख पुसली जाणार नाही याची दक्षता घेतली पण अलीकडे क्रिकेटमध्ये प्रचंड व्यावसायिकता आली आहे. त्यामुळे खेळाडूंचा संयम संपत चालला आहे.

28 एप्रिलला कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला मात्र या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची अखिलाडूवृत्ती पाहायला मिळाली. चौथ्या षटकात रोहित शर्मा पायचीत झाल्यानंतर या निर्णयाविरोधात त्याने डीआरएस घेतला मात्र त्यातही तो बाद झाला. त्यानंतर पॅव्हेलियनकडे जाताना त्याने नॉन स्ट्राईकएन्ड वरील स्टंपवर बॅट आदळत मैदानावरील पंचांशी हुज्जतही घातली. त्याच्या या कृत्याने क्रिकेटला गालबोट लागले आहे. क्रिकेटची अप्रतिष्ठाच करण्याचे काम त्याने केले आहे.

पंचांशी हुज्जत घालून त्याने जंटलमन्स गेमला मूठमातीच दिली आहे. त्याच्या या अखिलाडूवृत्तीचा नेटीजन्सनेही चांगलाच समाचार घेतला असून अनेक क्रिकेट चाहत्यांनी ट्विटर व्हाट्‌स ऍप सारख्या सोशल मीडियातून त्याची खिल्ली उडवली आहे. अनेक माजी खेळाडूंनी देखील रोहितच्या या अखिलाडूवृत्तीवर टीका केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्याला मानधनातील पंधरा टक्के रक्कम दंड म्हणून भरावा लागणार आहे.

पंचांचा निर्णय न पटल्याने कर्णधाराने पंचांशी मैदानावर हुज्जत घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. थंड डोक्‍याचा म्हणून ओळखला जाणारा कॅप्टन कुल अर्थात चेन्नई सुपर किंगचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही यापूर्वी मैदानावर पंचांशी हुज्जत घालताना दिसला. जयपूरमध्ये चेन्नई व राजस्थान यांच्यात अटीतटीची लढत झाली अखेरच्या षटकापर्यंत धोनी मैदानात होता शेवटच्या षटकात 18 धावांची गरज होती पण तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला आणि तो तंबूत परतला. उर्वरित तीन चेंडूवर आठ धावांची गरज होती, मिशेल सॅंटनर नॉन स्ट्राईकवर होता. राजस्थानच्या बेन स्टोकने फुलटॉस चेंडू टाकला पंचांनी तो नो बॉल दिला पण स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या पंचांनी हा निर्णय बदलला आणि हा चेंडू योग्य ठरवला. याबाबत फलंदाज रवींद्र जडेजा आणि मिशेल सॅंटनरने पंचांना याबाबत विचारणा करीत मैदानावरच त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरवात केली.

तंबूत परतलेला धोनी हे सगळं पाहत होता अखेर तो मैदानात घुसला आणि त्याने पंचांशी हुज्जत घातली. धोनीचे हे वर्तन धक्कादायक होते कारण धोनी एक आदर्श कर्णधार म्हणून ओळखला जातो. मैदानावर तो त्याचा संयम कधीच ढळू देत नाही असे असतानाही त्याने मैदानात घुसून पंचांशी हुज्जत घातली. धोनी असो की रोहित शर्मा पंचांशी मैदानात हुज्जत घालणे चुकीचेच आहे. मैदानावर किंवा मैदानाबाहेर कितीही दबाव असला तरी कर्णधाराने आपला संयम राखला पाहिजे. आपल्या वर्तुणुकीतून क्रिकेटची अप्रतिष्ठा होणार नाही याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. संघ मालकांनीही कर्णधारावर किंवा संघातील खेळाडूंवर दबाव आणू नये जंटलमन्स गेम हि क्रिकेटची ओळख पुसली जाणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)