उदंचन जलविद्युत प्रकल्पाची होणार निर्मिती

वरंधाघाट, वरसगांव प्रकल्पांच्या प्राथमिक अन्वेषण अहवालाला हिरवा कंदिल

पुणे – भारनियमनावर मार्ग काढण्यासाठी राज्यात 8 हजार 355 मेगावॅट क्षमतेचे वीजेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यापैकी वरंधाघाट येथे आठशे मेगावॅट आणि वरसगांव येथे 1200 मेगावॅट या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्राथमिक अन्वेषण अहवालाला हिरवा कंदिल मिळाला आहे.

वीजेची मागणी आणि उपलब्धता यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांचा समन्वय साधताना महावितरण प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातूनच शहरासह ग्रामीण भागातही भारनियमन सुरू करण्यात आले होते. ही नामुष्की टाळण्यासाठी प्रशासनाने खासगी स्रोतांकडून काहीशा चढत्या दराने वीजेची खरेदी करण्यात येत आहे. मात्र, महसूल आणि वीजेच्या खरेदीवर वाढत चाललेला खर्च यांचा ताळमेळ बसविताना महावितरण प्रशासनाच्या अक्षरश: नाकीनऊ आले होते. त्याची गंभीर दखल घेऊनच औष्णिक वीजनिर्मितीला पर्याय म्हणून उदंचन जलविद्युत वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

असा आहे उदंचन जलविद्युत प्रकल्प
उदंचन जलविद्युत प्रकल्पामुळे उपलब्ध पाण्यावर वीजनिर्मिती करणे शक्‍य होते. त्यासाठी उंचीवरील ठिकाणी एक धरण आणि त्यातुलनेत खालच्या बाजुला एक धरण बांधावे लागते. वीजेची मागणी जास्त असताना उंचीवरील धरणातून दिवसभर वीजनिर्मिती करून ग्रीडमध्ये टाकण्यात येते, तर रात्रभर ग्रीडमध्ये अतिरिक्त असलेली वीज स्वस्त दराने उपलब्ध होत असल्याने पंपाच्या सहाय्याने खालच्या बाजुला असलेल्या धरणांतील पाणी वरच्या धरणात सोडले जाते. उपलब्ध पाणी वारंवार वापरून वीजनिर्मिती केली जाते. याच पद्धतीने सध्या पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्‍यातील भाटघट धरणात उभारण्यात आला असून हा प्रकल्प 250 मेगावॅटचा असून त्याच्या क्षमतेत नव्या प्रकल्पानुसार वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)