कराड पालिकेचा होणार राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

चार हजार पालिकेतून निवड
स्वच्छ सर्वेक्षणातील उत्कृष्ठ कामगिरी

कराड – स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 या स्पर्धेत देशातील एक लाख लोकसंख्येच्या चार हजारांहून अधिक पालिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एकूण 42 नगरपालिकांची निवड करण्यात आली असून यामध्ये कराड नगरपालिकेचा समावेश आहे. सलग दोन वर्षे स्वच्छतेतील सातत्य राखल्यामुळे पालिकेने हे यश मिळविले आहे. 6 मार्च रोजी स्वच्छ सर्वेक्षणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महामहिम राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद व गृह आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री हरदिपसिंग पुरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पालिकेचा गौरव होणार आहे.

गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात 39 वा क्रमांक कराड नगरपालिकेने मिळवला होता. सन 2019 च्या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकामध्ये येण्याच्या दृष्टीने वर्षभर जोरदार प्रयत्न करण्यात आले. यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच शहरातील विविध सामाजिक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्यानेच पालिकेस हे यश मिळाले आहे. कराड 100 टक्के हागणदारीमुक्त करत शहर ओडीएफप्लसप्लस केले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, माजी आरोग्य सभापती प्रियांका यादव, राजेंद्रसिंह यादव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व शहरातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी महास्वच्छता अभियान दर पंधरा दिवसांनी राबविण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर चालता बोलता कचरा उचला स्पर्धा तसेच स्वच्छ वॉर्ड अशा प्रोत्साहनपर स्पर्धाही घेण्यात आल्या. स्वच्छतेची सवय लागावी यासाठी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. अशा स्वच्छतेबाबत केलेल्या उपाय योजनांमुळे आज कराड शहर स्वच्छ व सुंदर असल्याचे दिसत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण नियोजन व परिश्रमामुळे पालिकेने राज्यात पहिल्या क्रमांकांचा बहुमान प्राप्त केला आहे. स्वच्छता दूतांनीही यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने पालिकेस हे यश मिळाले आहे. दरम्यान, मंगळवारी याबाबत पालिका प्रशासनास व शहरवासियांना ही माहिती मिळाल्यानंतर पालिका पदाधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच कर्मचारी यांनी आनंद साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)