कचरा संकलन वाहतूक एक जुलैपासून

वाहने उपलब्ध नसल्याने निर्णय : ठेकेदाराला एक महिना मुदतवाढ
पिंपरी  – घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम दिलेल्या नवीन ठेकेदाराला हे काम सुरू करण्यासाठी आणखी एक महिनाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 1 जूनपासून काम सुरु होणारे काम आता 1 जुलैपासून सुरु होणार आहे. या कामासाठी वाहने उपलब्ध नसल्याने हे काम पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास अडचण निर्माण होत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

शहरातील कचरा संकलन आणि वाहनाबाबत स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी मंगळवारी (दि.28) आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे, आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, आशा राऊत, स्मिता झगडे, संदीप खोत, कंत्राटदार बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड आणि ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स यांच्या प्रतिनिधींसह सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

स्थायी समितीच्या 12 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड या ठेकेदाराला 21 कोटी 56 लाख तर दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स 22 कोटी 12 लाख रुपयांमध्ये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी महापालिकेने दोन्ही कंत्राटदारांना कामाची वर्कऑर्डर दिली होती. या दोन्ही ठेकेदारांना एक जूनपासून काम सुरु करण्यास सांगितले होते. परंतु, ठेकेदारांकडे कचरा संकलन करण्यासाठी नवीन वाहने उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे त्यांनी जुन्या वाहनांसहच काम सुरु करण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, महापालिकेने नवीन वाहनांसह एक जुलैपासूनच काम सुरु करण्याचे निर्देश ठेकेदारांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)