कोल्हापुरात सावकाराकडून नवविवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार

कोल्हापूर – पतीने घेतलेल्या कर्जमाफीचे आमिष दाखवून तसेच अश्‍लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन कोल्हापुरातल्या रूईकर कॉलनीतील एका तरुण सावकाराने नवविवाहित आभियांत्रिकी तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. साथीदाराच्या मदतीने संशयिताने पीडित तरुणीला अमानुष मारहाण करून, शरीरावर सिगारेटचे चटकेही दिले आहेत. सामुहिक बलात्कार करणाऱ्या तिघा नराधमांवर कोल्हापूरच्या शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित हरीश स्वामी (22, दत्त मंदिर जवळ, रुईकर कॉलनी, कोल्हापूर), आशिष पाटील (28, रा. सायबर चौक, राजारामपुरी), सदाम मुल्ला (29, यादवनगर, कोल्हापूर), अशी त्यांची नावे आहेत.

तरुणीचा पुण्यातील तरुणाशी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. घरातून विरोध झाल्याने दाम्पत्याने कोल्हापुरात भाड्याने खोली घेतली. संसारोपयोगी खर्चासाठी दाम्पत्याला पैशांची गरज भासली. पतीने रूईकर कॉलनीतील संशयिताकडून रोज साडेतीन हजार रुपये या दराने 30 हजार रुपयांचे कर्ज घेतले. व्याजाचे तीन हप्त्याचे साडेदहा हजार रुपये परत केल्यानंतर पुढील रक्‍कम देण्यास दाम्पत्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. सावकारी कर्ज वसुलीच्या निमित्ताने संशयित दाम्पत्याच्या घरी सतत येऊ लागला.

पती, पत्नीला शिवीगाळ, मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले. महिन्यापूर्वी रात्रीच्या सुमाराला संशयित सावकार महिलेच्या घरी आला. त्याने तिला घरातून बाहेर बोलावून घेतले. त्याने पतीची चौकशी केली. पती कामावर गेल्याचे समजताच सावकाराने महत्त्वाचे काम आहे, असे सांगून तिला मोटारीतून कळंबा रोडवर नेले. तेथे बीअर पिऊन मोटारीत बलात्कार केला. त्यानंतरही दहशत माजवून तीन, चारवेळा अत्याचार केल्याचे तरुणीने जबाबात म्हटले आहे.
सावकारासह साथीदाराकडून होणाऱ्या त्रासाला वैतागलेल्या तरुणीसह पतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यवाहक गीता हसूरकर, मंगल पवार यांच्याशी संपर्क साधला. अत्याचाराचा घटनाक्रम मांडला. हसूरकर, पवार यांनी पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांना घटनेची माहिती देताच, कारवाईची चक्रे गतिमान झाली. संशयित स्वामी, त्याचे मित्र आशिष पाटील, सदाम मुल्ला तिघेही संशयित सराईत आहेत. गुन्हा दाखल झालेची माहिती समजताच ते पसार झाले आहेत.

आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अत्याचारप्रकरणी चौकशी करून संशयित सावकार, साथीदारावर कठोर कारवाईचे आदेश पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना देण्यात आले आहेत, असे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)