विविधा : बाबाराव सावरकर

-माधव विद्वांस

गणेश दामोदर सावरकर ऊर्फ बाबाराव सावरकर यांचे आज पुण्यस्मरण (निधन 16 मार्च 1945). त्यांचा जन्म 13 जून 1879 रोजी नाशिक जवळील भगुर येथे झाला. बाबाराव, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू.

बाबारावही स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्‍तिमत्त्व होते. त्यांच्या पूर्वजांनी बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या वेळी केलेल्या पराक्रमामुळे पेशव्यांनी नारायण दीक्षित (सावरकर) यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर जवळच्या राहुरीची जहागीर दिली होती. दामोदरपंतांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. भगूर परिसरात त्यांच्या इतके शिकलेले अन्य कोणीही नसल्याने त्यांना विशेष मान होता.

पिढीजात जहागीर सांभाळणे आणि सावकारी हे त्यांचे व्यवसाय होते. त्यांचे स्वतःचे अनेक विषयांचे अनेक लेखकांच्या पुस्तकांचे ग्रंथसंग्रहालय होते. त्यांना योगविद्या, वैद्यकीची आवड होती. ते स्वतः काही औषधे तयार करीत असत. फलज्योतिष्य, शरीरशास्त्र, सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, योग, वेदान्त अशा शास्त्रांचाही सखोल अभ्यास त्यांनी केला. मात्र ते विज्ञाननिष्ठ होते. त्यांना गाण्याची आवड होती ते तबला, सतारही वाजवीत असत. ते उत्तम लेखक होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. इतिहास त्यांचा आवडीचा विषय असल्याने भारतातील अनेक शूरवीरांच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या.

त्यांना स्वयंपाक उत्तम जमत असे. आईच्या निधनानंतर घरात तेच स्वयंपाक करत असत. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक होते. तात्याराव (स्वातंत्र्यवीर) लंडनला असताना ते नाशिकमध्ये क्रांतिकार्य करीत होते. “रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ या कवी गोविंद यांनी केलेल्या कवितेचे त्यांनी प्रकाशन केले.

वंगभंग चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना अटक झाली तसेच त्यांच्या घरात आक्षेपार्ह कागदपत्रे सापडल्याने त्यांच्यावर खटला होऊन त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. वर्ष 1911 मधे अंदमान येथील तुरुंगात पाठविण्यात आले. त्याच वेळी तात्यारावांनाही जन्मठेप झाली त्यांची रवानगी अंदमानला झाली होती.

बाबारावांना तुरुंगातील अमानुष छळामुळे क्षयाची बाधा झाली. वर्ष 1921 मध्ये त्यांना भारतात आणण्यात आले. या 11 वर्षांच्या कालखंडात त्यांची व तात्याराव सावरकरांची अंदमानामध्ये एकदाही भेट झाली नाही.त्यांची व त्यांच्या पत्नीचीही अखेरपर्यंत भेट होऊ शकली नाही. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भेटीच्या परवानगीचे पत्र त्यांच्या घरी आले.

त्यांच्या तब्येतीची नाजूक अवस्था पाहून त्यांची तातडीने सुटका करण्यात आली त्यानंतर ते सांगली येथे येऊन राहिले व आजारपणावर मात करत आपले काम पुन्हा सुरू केले. 16 मार्च 1945 रोजी त्यांचे निधन झाले. सांगली शहरात बाबाराव सावरकर यांचे एक स्मारक करण्यात आले होते होते. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी हे स्मारक जाळून टाकले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)